
जीएसटी क्रेडिट मिळवून फसवणूक करणाऱ्याला अटक
पुणे, ता. १२ : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) नोंदणी बनावट कागदपत्रांचा वापर करून ७० कोटींचे जीएसटी क्रेडिट मिळवून फसवणूक करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या साहाय्याने जीएसटी विभागाने आंतरराज्यीय कारवाई केली आहे. सिराजुद्दीन कमालउद्दीन चौधरी (वय २९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जीएसटी विभागाच्या पुणे युनिटने संशयावरून चार प्रमुख पुरवठादारांची चौकशी केली. त्यात जीएसटी नोंदणीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून मोठी फसवणूक केल्याचे आढळून आले. त्याने ७० कोटी २२ लाख रुपयांची बनावट बिले तयार केली. मालाची पावती न घेता ओलायन डेस्कॉन इंडस्ट्रिअल कंपनीत १२ कोटी ५९ लाख रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले.
आरोपी सिराजुद्दीन चौधरी हा फरार होऊन उत्तर प्रदेशात लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी विशेष तपास पथक पाठवण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने पथकाने आरोपीला १० मार्च रोजी अटक केली. त्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातून ट्रान्झिट रिमांड अंतर्गत पुण्यात आणले. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे विभागाचे अतिरिक्त कर आयुक्त धनंजय आखाडे, सह आयुक्त दीपक भंडारे, उपायुक्त मनीषा गोपले-भोईर, सहायक आयुक्त सचिन सांगळे, दत्तात्रेय तेलंग, सतीश लंके, सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जीएसटी विभागाने २०२२-२३ या वर्षामधील केलेली ही ६८ वी कारवाई आहे. या विभागाने यापूर्वीही गुजरात, गोवा आदी राज्यांमधून चोरट्यांना अटक केली होती.