समान पाणी पुरवठा योजनेचे वर्षात केवळ १५ टक्के काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Line
समान पाणी पुरवठा योजनेचे वर्षात केवळ १५ टक्के काम

Water Supply Scheme : समान पाणी पुरवठा योजनेचे वर्षात केवळ १५ टक्के काम

पुणे - समान पाणी पुरवठा योजनेचे काम करताना नगरसेवक जलवाहिनी टाकू देत नाहीत, कामाची अडवणूक केली जाते, अशा तक्रारींचा पाढा प्रशासनाकडून सुरू केला जात होता. मात्र, महापालिकेत प्रशासकराज आल्यानंतर गेल्या वर्षभरात या योजनेचे केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात योजनेची मुदत संपली तरीही केवळ ५५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. आता या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवण्याची नामुष्की आली आहे.

वाद संपल्यानंतर पुन्हा काम सुरू

पुणे शहरात असमान पाणी पुरवठा होणाऱ्या यंत्रणेत बदल करून सर्व भागात समान व पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी २०१७ मध्ये दोन हजार ४५० कोटी रुपयांच्या समान पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. यासाठी शहराची पाच पॅकेजमध्ये विभागणी करून प्रत्येक कामाची निविदा काढली. पॅकेज चारच्या निविदेत ठेकेदारासोबत वाद झाल्याने हा वाद लवादात गेला होता. त्यामुळे लष्कर, कोंढवा, हडपसर, खराडी या भागाचे काम काहीच झाले नव्हते. गेल्यावर्षी वाद संपल्यानंतर पुन्हा काम सुरू झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत या पॅकेजचे केवळ १२ टक्के काम झाले असून, हे काम २०२५-२६ मध्ये पूर्ण होणार आहे.

४०० किमी जलवाहिनीचे काम शिल्लक

पुणे महापालिकेत प्रशासक आल्यानंतरही या योजनेच्या कामाला गती मिळाली नाही. २०१७ ते मार्च २०२२ या कालावधीत योजनेचे केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले होते. गेल्या वर्षभरात १५ टक्के वाढ होऊन, ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. वर्षभरात १२४ किलोमीटरची जलवाहिनी टाकली असली तरीही अजून ४०० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम शिल्लक आहे. २०२२-२३ मध्ये १८ हजार मीटर बसविले आहेत. अद्याप सव्वा दोन लाख मीटर बसण्याचे काम शिल्लक आहे.

समान पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ मागण्यात आली आहे.

- नंदकिशोर जगताप, अधिक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग

समाविष्ट गावांसाठी नव्या योजना

- अर्थसंकल्पात ३४ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद

- बावधन बुद्रूक गावासाठी २२ कोटी रुपयांच्या योजनेचे भूमिपूजन झाले

- सूस-पाषाणसाठी ६६ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया सुरू

- लोहगाव-वाघोलीतील पाणी पुरवठा योजनेसाठी २८० कोटींचा डीपीआर तयार

- १५० कोटींपैकी ८२ कोटी इतर कामासाठी वर्गीकरण

समान पाणी पुरवठा योजनेची सद्यःस्थिती

  • ८२ - पाणी टाक्यांची संख्या

  • ४२ - बांधून पूर्ण झालेल्या टाक्या

  • १२५० किलोमीटर - टाकल्या जाणाऱ्या जलवाहिन्या

  • ८२७ किलोमीटर - आतापर्यंत टाकलेल्या जलवाहिन्या

  • ३.१८ लाख - मीटर बसविणार

  • १.३ लाख - बसविलेले मीटर

  • ५५ टक्के - योजनेचे संपलेले काम

  • ४५ टक्के - शिल्लक काम

  • मार्च २०२४ - योजना पूर्ण होण्याची अंतिम मुदत