खड्डेमुक्तीचा प्रयत्न अन नव्या रस्त्यांचा शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डेमुक्तीचा प्रयत्न अन नव्या रस्त्यांचा शोध
खड्डेमुक्तीचा प्रयत्न अन नव्या रस्त्यांचा शोध

खड्डेमुक्तीचा प्रयत्न अन नव्या रस्त्यांचा शोध

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रशासक काळात पुणेकरांना प्रचंड त्रास झाला. रस्ते दुरुस्त केले तरी पॅचवर्क व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांसह वाहन चालकांना आरामदायी प्रवास मिळाला नाही. प्रचंड टीका झाल्यानंतर ३२५ कोटी रुपये खर्च करून १४० किलोमीटरचे रस्ते केले जाणार आहेत. तसेच, शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने विकास आराखड्यात दाखविलेले पण अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांचा शोध घेण्यासाठी सल्लागार नियुक्त केला आहे.

अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता
पुणे शहरात एक हजार ३९८ किलोमीटरचे रस्ते आहेत. गेल्या दोन वर्षांत समान पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी, मलवाहिनी, मोबाईल केबल यांसह इतर कारणांमुळे सर्वच भागांत खोदकाम झाले. महापालिकेला यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले; पण रस्ते दुरुस्तीवर हा निधी खर्च झाला नाही. रस्ते खोदाईनंतर सिमेंट काँक्रिट किंवा डांबर टाकून खड्डे बुजविले, पण हे काम निकृष्ट असल्याने पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवर खड्डे पडले होते. नागरिक टीका करत असले तरी अधिकाऱ्यांमध्ये खड्ड्यांबाबत उदासीनता असल्याचे प्रशासक काळात दिसून आले. क्षेत्रीय कार्यालयांनी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यास विलंब केला, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.

दोन महिने वाया
शहरात ‘जी २०’ परिषद होणार असल्याने अखेर महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी पाऊल उचलले. प्रमुख रस्त्यांसह काही क्षेत्रीय कार्यालयांचे रस्ते असे एकूण १४० किलोमीटरच्या कामांसाठी ३२५ कोटी रुपयांच्या पाच निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी तीन निविदांमधून शहरात काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० किलोमीटर रस्‍त्यांची कामे झाली आहेत. निविदा क्रमांक चार आणि पाचमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे त्या निविदा रद्द करून पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू करावी लागल्याने दोन महिने वाया गेले आहेत. त्यामुळे पुणेकरांना अजूनही चांगल्या रस्त्यांची प्रतिक्षा आहे.

शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यासाठी पाच पॅकेजमध्ये ३२५ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्यापैकी तीन निविदांचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून, ४० किलोमीटरचे डांबरीकरण झाले आहे. उर्वरित कामेही लवकर पूर्ण होतील.
- व्ही. जी. कुलकर्णी,
प्रमुख, पथ विभाग


वाहतूक सुधारणेसाठी प्रयत्न
- विकास आखाड्यात इंटरमिजिएट रिंगरोडची आखणी
- ७० पैकी ४७ किलोमीटरचे रस्ते अस्तित्वात
- उर्वरित २३ किलोमीटर रस्त्यांच्या मिसिंग लिंक शोधणार
- बोगदे, नदीवरील पूल, रेल्वेवरील पूल प्रस्तावित
- या कामासाठी सल्लागार नियुक्त
- सुरक्षीत शालेय वाहतुकीसाठी खराडी, सहकारनगर-मुकुंदनगर भागात उपक्रम राबविला
- डिसेंबर महिन्यात पादचारी दिन उपक्रम राबविला