
ससून रुग्णालयात आजपासून बेमुदत बंद
पुणे, ता. १३ : जुने निवृत्ती वेतन मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. १४) बेमुदत संप पुकारला आहे, अशी माहिती राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या ससून रुग्णालय, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग विभाग यांच्यातर्फे कळविण्यात आले.
याबाबत बी. जे. व ससून सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर परमार म्हणाले, ‘‘मंगळवारी सकाळपासून हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबतची पूर्वकल्पना महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला यापूर्वी दिली आहे. या आंदोलनात रुग्णालय आणि महाविद्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांचे जुने निवृत्ती वेतन लागू करावे, यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.’’
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले, ‘‘या संपामुळे रुग्णसेवा विस्कळित होणार नाही, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यावर भर दिला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना संपापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे.’’