महापालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका
महापालिका

महापालिका

sakal_logo
By

नगरसेवकाला मतदान केले असल्याने त्याच्याकडे बोट दाखवून जबाबदार धरता येते. तसे अधिकाऱ्यांच्या बाबतीत होत नाही. एकतर संपर्क होत नाही, झालाच तर उडवाउडवीची उत्तरे भेटतात. नगरसेकाला कधीही भेटता येते. मात्र अधिकाऱ्यांना भेटता येत नाही. त्यांना वेळेतच गाठावे लागते.
- मंगेश भगत, कात्रज

पाणी, वीज, कचरा हे प्रश्न अत्यंत अडचणीचे ठरत आहेत. अशावेळी नेमके कोणत्या अधिकाऱ्याकडे जायचे हा प्रश्न पडतो. नगरसेवक असल्यास कोणताही प्रश्न घेऊन त्यांच्याकडे थेट जाता येत होते. आता विविध प्रश्नांवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना शोधत राहावे लागते. यात वेळ खूप जातो आणि प्रश्न सुटत नाहीत.
- डॉ. सुचेता भालेराव, कात्रज-कोंढवा रस्ता

सोसायट्यांचे खूप प्रश्न आहेत. भरमसाठ कराच्या नोटिसा आल्यात; परंतु रस्ता, पुरेसे पाणी अशा मूलभूत सुविधा अद्याप महापालिकेकडून मिळत नाहीत. सर्वसामान्य नागरिक थेट पालिकेत जाऊन कसे प्रश्न मांडणार? लोकप्रतिनिधी असते तर त्यांच्याकडे पाठपुरावा करता आला असता.
- निर्मला स्वामी, किरकटवाडी

सोशल मीडियावर आम्ही तक्रारी मांडतो; परंतु पालिका त्याची दखल घेतेच असे नाही. खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालिकेत आल्यामुळे वर्षभरात विशेष असा बदल दिसलेला नाही. लोकप्रतिनिधी असणे अत्यंत आवश्यक आहे.
- योगिता बागणीकर, किरकटवाडी.

नागरिकांना स्ट्रीट लाइट बंद असणे, कॅमेरे बंद असणे, ड्रेनेज तुंबणे, पाणी कमी दाबाने येणे आदी छोट्या स्वरूपातील समस्या सोडविण्यासाठीदेखील वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. लोकप्रतिनिधी असतील तर नागरिक हक्काने याबाबत सांगू शकतात.
- नरेंद्र हगवणे, किरकटवाडी

गंज पेठेतून टिंबर मार्केट परिसरात नाल्यातील घाणीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त आहे. पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येते. अंतर्गत गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. काही भागात निकृष्ट दर्जाची कामे झालेली आहेत. प्रशासनाच्या हाती दोन वर्षांपासून कार्यकाळ आहे. नगरसेवकांकडे पाच वर्षे असतानादेखील परिस्थिती आजही तशीच आहे.
- संदीप पाटोळे, गंज पेठ

ड्रेनेज, पाणी, स्वच्छता या मूलभूत सुविधा नागरिकांना भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी असताना आणि आता प्रशासकीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. भरमसाठ पगार घेऊन अधिकारी तुपाशी, नागरिक उपाशी अशी अवस्था आहे. वर्षभरात कुठलाही बदल झालेला नाही. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहेत.
- निकीता जाधव, रहिवासी कासेवाडी


पालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांना समस्या कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न आहे. कारण प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरे देतात. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे दाद कुणाकडे मागायची ही समस्या निर्माण झाली आहे.
- नानासाहेब निकम, औंध

प्रशासकराज असताना नागरिकांची कामे पाहिजे तशी होत नाहीत व अनेक कामे रखडली आहेत. लोकप्रतिनिधी किमान आमच्या समस्या ऐकून सोडविण्यासाठी प्रयत्न तरी करतात. परंतु प्रशासनाकडून असे काही होताना दिसत नाही.
- नीता जवळेकर, औंध

नगरसेवक नसल्यामुळे महापालिका प्रशासनासोबत कसा संवाद साधायचा तेच कळत नाही. एकतर अधिकाऱ्यांचे नंबर मिळत नाहीत आणि नंबर मिळाला तर ते फोन घेत नाहीत. बजेट उपलब्ध नाही, असे कारण ऐकायला मिळते.
- कविता पवार, वडगाव शेरी

काही समस्या सांगायची असेल तर अधिकारी फोन घेत नाहीत. अधिकारी कोण बदलून गेले ते लवकर समजत नाही. एखादे काम निकृष्ट होत असेल तर जाब विचारणारा नगरसेवक नसल्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.
- प्रकाश धोत्रे, वडगाव शेरी