
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना कला जीवनगौरव पुरस्कार
पुणे, ता. १३ ः यशवंतराव चव्हाण यांनी आयुष्यात संस्कार, नीतिमूल्य आणि संस्कृती जोपासली. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार जबाबदारी वाढवणारा आहे, अशी भावना दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली.
स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्र मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त तरडे यांना प्रकाश ढेरे स्मृतिप्रित्यर्थ ‘कला जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर, ट्रस्टचे विश्वस्त विजय ढेरे आदी उपस्थित होते. या वेळी वर्जेश सोलंकी, आबा पाटील, नितीन देशमुख आणि हर्षदा सुंठणकर या कवींचा साहित्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सत्कारानंतर राज्यभरातून आलेल्या कवींचे कवी संमेलन रंगले. गझल, प्रेमगीते, विडंबन कवितांनी हे संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. रामदास फुटाणे व अशोक नायगावकर यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.