
अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे विद्रुपीकरणात भर
पुणे, ता. १२ ः शहरातील रस्त्यांवर सध्या सण, उत्सव, धार्मिक, वैयक्तिक कार्यक्रमापासून ते निवडणुका, अभिनंदन, आभार व अन्य विविध प्रकारच्या फ्लेक्सबाजीने पुन्हा एकदा विद्रुपीकरण सुरू झाले आहे. फ्लेक्सबाजीविरुद्ध यापूर्वी कारवाईची भूमिका घेणाऱ्या महापालिकेला आता पुन्हा कारवाईला कधी मुहूर्त मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहराच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा फ्लेक्स लावल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा प्रकारे जोरात सुरू झालेल्या फ्लेक्सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याच्या प्रकारावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला होता. त्याची गांभीर्याने दखल घेऊन पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वेगवेगळ्या भागात लावलेल्या फ्लेक्सवर तत्काळ कारवाई करण्याचा धडाका लावला होता. मात्र काही कालावधीनंतर ही कारवाई थंडावली.
दरम्यान, शहरात कसबा पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार व कार्यकर्त्यांकडून गल्लीबोळात फ्लेक्सबाजी सुरू होती. आता निवडणूक झाली, त्याचा निकालही लागला. त्यानंतर पुन्हा विजयी उमेदवारांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स शहरभर झळकले. त्याचबरोबर मतदारांच्या आभाराचेही. महापुरुषांची जयंती, विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स पुन्हा एकदा वीजेचे खांब, बसथांबे, दिशादर्शक फलक अशा विविध ठिकाणी झळकू लागले आहेत. त्याचबरोबर नोकरी, उद्योग, व्यवसाय, खासगी क्लासेस अशांचीही त्यात भर पडत गेली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत महत्त्वाचे चौक, प्रमुख रस्ते अशा विविध ठिकाणी बेकायदा फ्लेक्स लावण्यास सुरुवात झाली आहे.
शहरात बेकायदा फ्लेक्स लावण्याचे प्रकार दिसू लागले आहेत. त्यादृष्टीने संबंधितांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे.
- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका
शहरातील प्रत्येक रस्ते, चौकांवर फ्लेक्स दिसतात. बेकायदा फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण सुरू झाले आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. आपल्या शहरातील प्रत्येक रस्ता, चौकाला मोकळा श्वास घेता आला पाहिजे.
- केशव साने, नागरिक
PNE23T30351