
संतुलन संस्थेच्या वतीने ‘कष्टकरी शेतकरी महिला परिषद’
पुणे, ता. १३ : विधवा महिलांना निवृत्ती वेतनासाठीच्या अटी शिथिल कराव्यात, ५० वर्षावरील महिलांना उत्पन्नाच्या निकषावर निवृत्ती वेतन सुरू करावे, मुली आणि महिलांना केजी ते पीजी शिक्षण मोफत करावे, मोफत बस सुविधा मिळावी, असे ठराव संतुलन संस्थेच्या वतीने आयोजित ‘संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदे’त करण्यात आले.
संतुलन संस्थेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून ही परिषद आणि जागृती रॅली आयोजित केली होती. परिषदेचे उद्घाटन पुणे जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांच्या हस्ते झाले.
यावेळी संस्थेच्या संचालिका अॅड. पल्लवी रेगे, अध्यक्षा वंदना भुजबळ, ॲड. कल्पना निकम, शीतल यशोधरा, ॲड. राणी सोनावणे, विजया काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेत मांडलेले ठराव शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. यावेळी ‘स्त्री अस्मिता सन्मान’ आणि ‘संतुलन हिरकणी पुरस्कार’ यांचे वितरण करण्यात आले. आदिनाथ चांदणे आणि कैलास पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर अनिल राजगुरू यांनी आभार मानले.