डोळ्यांकडे पाहिले वेगळ्याच नजरेने! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोळ्यांकडे पाहिले 
वेगळ्याच नजरेने!
डोळ्यांकडे पाहिले वेगळ्याच नजरेने!

डोळ्यांकडे पाहिले वेगळ्याच नजरेने!

sakal_logo
By

‘जर तुम्ही तुमच्या बायकोकडे डोळे मोठे करून बघत नसाल तर मग आमच्याकडे बिनधास्तपणे तसे बघा.’ चष्म्‍याच्या दुकानातील ही पाटी वाचून जनूभाऊ तणतणत काऊंटरवर गेले.
‘‘सर नमस्कार’’ सुहास्य वदनाने एका तरूणीने म्हटले.
‘‘तुमचा नमस्कार घ्यायला मी दुकानात आलो नाही. नमस्कार, चमत्कार वगैरे राहू द्या बाजूला. दुकानाच्या मालकाला बोलवा. त्यांचा हिशेब करायचाय.’’ डोळे वटारून जनूभाऊंनी म्हटले. इतर कर्मचाऱ्यांकडे त्यांनी काना- डोळा केला. तेवढ्यात धोतर - पैरण असा वेष धारण करणारे मालक पुढे आले.
‘‘कायऽऽऽयेऽऽ.’’ मालक नेहमीप्रमाणे खेकसले.
‘‘ इतके दिवस उधारी ठेवून, आमचा डोळा चुकवत होतात ना? आमच्याकडे उधारी बंद आहे, हे तुम्हाला माहिती नाही का? तरीही तुम्ही आमच्या दुकानात उधारी ठेवलीच कशी?’’ मालकाने सटासट शिंका याव्यात, तसे प्रश्‍न विचारले.
‘‘अहो, कसली उधारी? मी तुमच्या दुकानात पहिल्यांदाच आलोय आणि तुमच्या दुकानात मी उधारी ठेवली, याचा जाब मला का विचारताय? तुमच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरा.’’ जनूभाऊंनी म्हटले.
‘‘ कोणाला धारेवर धरायचं आणि कोणाला डोळ्यांवर धरायचं, हे तुम्ही मला शिकवू नका. मी काय इतर दुकानदारांसारखा ग्राहकांच्या वाटेकडे डोळे लावून बसत नाही. दुसऱ्यांच्या दुकानात जाणाऱ्यांवरही माझा डोळा नसतो. त्यांचा पैसाही माझ्या डोळ्यात सलत नाही. एवढं लक्षात ठेवा. ‘मालकाला बोलवा, हिशेब करायचाय’ हे तुम्हीच म्हणालात ना? मग हिशेब म्हणजे उधारीचाच असणार ना.? की लग्नकार्याचा असणार आहे?’’ मालकाने जनूभाऊंच्या डोळ्याला डोळा भिडवत म्हटले.
‘‘आमच्या घरातील लग्नकार्याचा हिशेब आम्ही तुमच्या दुकानात येऊन कशाला करू? काहीतरी तारतम्याने बोलत जा. अर्थात वाट्टेल त्या जाहिराती दुकानावर लावणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार म्हणा. ’’ जनूभाऊंनी म्हटले.
‘‘आमची जाहिरात पाहून तुमचे का डोळे पांढरे झालेत? अनेकांनी आमची ही जाहिरात डोळ्यांत साठवली आहे. तुम्ही मात्र डोळ्यांवरील अज्ञानाची झापड दूर करा. आमच्या दुकानातील चष्मा वापरल्याशिवाय तुमचे डोळे उघडणार नाहीत. आमच्याबरोबरच इतरांच्या जाहिरातीही डोळ्यांखालून घाला.’’ मालकाने डोळे मोठे करून म्हटले.
‘‘जाहिरातीत म्हटलंय, की ‘बायकोकडे डोळे मोठे करून बघत नसाल’ म्हणजे? तुम्ही काय लोकांच्या घरी जाऊन खात्री केली होती का? आम्ही आमच्या बायकोकडे डोळे मोठे करून बघत नाही, हे तुम्हाला कोणी सांगितले? घरी नवरा- बायकोने एकमेकांकडे प्रेमाने बघायचे की डोळे मोठे करून बघायचे, हे सांगणारे तुम्ही कोण? तुमच्या जाहिरातीमुळे नवरा- बायकोच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला गेलाय. त्यामुळे मी तुमचा निषेध करतो.’’ जनूभाऊंनी म्हटले.
‘‘हे बघा, आमची जाहिरात तुमच्या डोळ्यांत का खुपते, हेच कळत नाही? तुम्हाला दुसऱ्यांच्या डोळ्यांतील कुसळ दिसतं. इतर ठिकाणी कसल्याही जाहिराती असतात. तिथं मात्र तुम्ही डोळे मिटून घेणार. अशा जाहिरातींविरोधात तुम्ही का रान उठवत नाही.?’’ दुकानदाराने विचारले.
‘‘मी काय करायचं, हे तुम्ही मला शिकवू नका. तुमच्याशी वाद घालतोय ना, त्याला तुमचीच जाहिरात जबाबदार आहे.’’ जनूभाऊंनी म्हटले.
‘‘आम्ही काय तुम्हाला जाहिरातीतून वाद घालायला सांगितलंय का?’’ दुकानदाराने म्हटले.
‘‘हो. वाद घाला, असंच सांगितलंय. ‘जर तुम्ही तुमच्या बायकोकडे डोळे मोठे करून बघत नसाल तर मग आमच्याकडे बिनधास्तपणे तसे बघा.’ असं तुम्ही म्हटलंय. त्यामुळेच डोळे मोठे करून, मी तुमच्यासोबत भांडतोय.’’ जनूभाऊंनी खुलासा केला. त्यांचं बोलणं ऐकून दुकानदाराचे डोळे गरगरले. सध्या त्यांनी जाहिरातीत ‘आमच्याकडे डोळे मोठे करून बघा पण आमच्याशी भांडू नका’ असा बदल केलाय.
---------