कसरत, काटकसर अन् कष्टकरी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसरत, काटकसर अन् कष्टकरी!
कसरत, काटकसर अन् कष्टकरी!

कसरत, काटकसर अन् कष्टकरी!

sakal_logo
By

आणीबाणीच्या काळापासून अनेक संकटाला सामोरे जात डॉ. बाबा आढाव यांना आयुष्यभर प्रोत्साहित करणाऱ्या त्यांच्या पत्नी शीलाताई आढाव यांना ‘ग्रॅव्हिटास‌ फाउंडेशन’चा जीवन गौरव पुरस्कार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता नवी पेठीतील एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.

- पांडुरंग सरोदे

प्रश्‍न ः वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाल्यानंतर कुठल्या अडचणी येत गेल्या?
- डॉ. बाबा आढाव व मी दोघेही राष्ट्र सेवा दलाचे. बाबांचे नाव, काम मी ऐकून होते. दोघेही समविचारी, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे लग्नाला लगेच होकार दिला. मी तेव्हा, भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करीत होते. तर बाबांचे कार्यक्षेत्र पुणे होते. त्यामुळे मी तेथील राजीनामा दिला आणि पुण्याला आले. बाबा तेव्हा डॉ. अनिता अवचट यांच्यासमवेत नाना पेठेत हमाल पंचायतीचा दवाखाना चालवायचे. चळवळीचे कामही तेथूनच करायचे. त्यामुळे घरी राज्यभरातील कार्यकर्त्यांची कायम वर्दळ होती. ही वर्दळ पाहून मी अक्षरशः हादरून गेले होते. घरी येणाऱ्यांचे चहा, नाश्‍ता, जेवण करावे लागायचे. त्यातच बाबांनी दोनदा लोकसभा निवडणूक लढली. त्यामुळे हा ताण वाढतच गेला. घर, संसार, मुलांचा अभ्यास, स्वयंपाक सांभाळून बाबांना दवाखान्यात मदत करत होते. ही तारेवरची कसरत २५ वर्ष काढली.

- काटकसर करून घर उभारण्यापासून ते मुलांचे संगोपन, शिक्षण हे आव्हान कसे पेलले ?
- मी तेव्हा महापालिकेच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम सुरु केले होते. डॉ. अनिता अवचट गेल्यामुळे बाबांनीही त्यांचे क्लिनिक बंद केले होते. त्यावेळी पगाराशिवाय पैसे नव्हते. त्यामुळे मी व मुले असीम व अंबर अशा आम्ही तिघांनी कमालीची काटकसर केली. दहावीपर्यंत मुलांची कपडे मीच घरी शिवत होते. मी तर अक्षरशः २०-३० वर्ष एकच साडी वापरत होते. पै-पै जमवून बिबवेवाडीत थोडी जागा घेतली. तिथेच हळूहळू घर बांधले. तेव्हा बाबा नाना पेठेतून बिबवेवाडीला यायला तयार नव्हते. त्यांना कसेबसे तयार केले. घर, नोकरी सांभाळतानाच दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.

- आयुष्यातील सर्वांत कठीण संकटाला कसे सामोरे गेलात?
- आणीबाणीमुळे बाबा वर्षभर तुरुंगात होते. इकडे अंबर तीन वर्षांचा होता. त्याला कावीळ झाली होती. त्याचा ताप वाढत जात होतो. तेव्हा, एस. एम. जोशी यांचा मुलगा डॉ. अजय जोशी यांनी मोठा आधार दिला. अंबर लहान असूनही समजूतदार होता. रात्री-बेरात्री इंजेक्‍शन घेताना कधी रडलाही नाही. एक महिना रजा काढली, पण अंबरला मरणाच्या दाढेतून बाहेर काढले. तेव्हा अनेकांनी आधार दिला. पण मी कोणाच्याही पैशांचा आधार केला नाही. त्या संकटाला सामोरी गेले.

- आई-वडीलांच्या पुरोगामी संस्कारांचा पुढे कसा उपयोग झाला?
- मी बुद्धिप्रामाण्यवादी कुटुंबात वाढले. माझे आई-वडील राष्ट्र सेवा दलाच्या विचारांचे होते. आम्ही दोघीही बहिणी होतो. वडील हेडमास्तर असल्यामुळे त्यांनी कधी अंधश्रद्धा, बुवाबाजीला थारा दिला नाही. प्रदूषणामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने फटाकेही उडवायचे नाहीत, हे त्यांचे संस्कार. राष्ट्र सेवा दलाच्या बौद्धिक, शिबिरांना ते आम्हाला आवर्जून पाठवीत होते. मी दहावी-बारावीला असताना त्या काळी पॅंट-शर्ट परिधान करीत होते. इतका मोकळेपणा तेव्हा होता. तेच संस्कार आमच्या मुलांवर होत गेले.

- ९२ वर्षीय बाबा चळवळीत सक्रिय असण्याचे गमक काय आहे?
- मुळात बाबांचा दैनंदिन आहार, पथ्य यावर मी पूर्वीपासूनच भर दिला आहे. त्यामुळे ते ९२ वर्षीही चळवळीत तितक्‍याच ताकदीने सक्रिय आहेत. परंतु, मध्यंतरी त्यांना कर्करोगाला सामोरे जावे लागले. आम्ही दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने या प्रसंगाला धैर्याने सामोरे गेलो. त्यांच्यावर चांगले उपचार केले. आता ते पूर्वीसारखेच हळूहळू चळवळीत सक्रिय झाले आहेत. सर्वांमुळे मीही त्यांना ‘बाबा’ म्हणून, तर ते मला माझ्या नावानेच बोलवितात.


- तुमच्यातील लेखिकेला कसा वाव मिळाला ?
- मी गाडीखाना दवाखान्यात परिचारिका म्हणून काम करत होते. तेव्हा, वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या महिला उपचारांसाठी आमच्याकडे येत होत्या. त्या खूप अडचणींमध्ये होत्या. त्यांच्याशी संवाद साधताना, त्यांचे हे दुःख, वेदना जगासमोर मांडण्याची इच्छा झाली. त्यानुसार, त्यांच्या आयुष्यावर आधारित लेख ‘पुरोगामी सत्यशोधक’ त्रैमासिकात छापून आला. त्यानंतर मुले परदेशात स्थायिक झाल्याने आम्ही त्यांच्याकडे जाऊ लागलो. नातवंडांबरोबर वेळ घालवितो. तेव्हा परदेशातील वातावरण कष्टकऱ्यांना कळावे या हेतूने अमेरिका, स्वीडन, नॉर्वे, कॅनडा अशा १० ठिकाणांवरील प्रवासवर्णने लिहिली. इतकेच नव्हे, वयाच्या ७५व्या वर्षी मी संगणक शिकले. ८६व्या वर्षी मोबाईल, इंटरनेट शिकण्यास प्राधान्य दिले.