
२४ ते २६ मार्च दरम्यान रंगणार ‘पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव’
पुणे, ता. १३ ः आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणारा १६ वा पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव यंदा २४ ते २६ मार्च दरम्यान रंगणार आहे. कोथरूड येथील यशंवतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या महोत्सवात दरवर्षीप्रमाणे ‘युवोन्मेष’ हा युवा कलाकारांच्या महोत्सवही पार पडेल.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांनी ही माहिती दिली. यंदा ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना ‘पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार’ तर युवा गायक आदित्य खांडवे यांना ‘पं. जितेंद्र अभिषेक स्मृती युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य हेमंत पेंडसे, सतारवादक सुब्रता डे, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, ओंकार दादरकर, रुद्रवीणावादक उस्ताद बहाउद्दीन डागर, पं. विनायक तोरवी, कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस आदींचे सादरीकरण होणार आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय रचनांचा समावेश असलेल्या शौनक अभिषेकी आणि देवकी पंडित यांच्या ‘श्यामरंग’ या कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. महोत्सव दररोज सायंकाळी ५.३० वाजता आणि युवोन्मेष शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) सकाळी ९.३० वाजता रंगणार आहे.