
धनादेश न वटल्याने १० लाखांची भरपार्इ
पुणे, ता. १४ : हात उसने घेतलेले पाच लाख रुपये परत करण्यासाठी दिलेला धनादेश वटला नाही म्हणून एका व्यावसायिकाला न्यायालयाने १० लाख रुपयांची नुकसान भरपार्इ जमा करण्याचा आदेश दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. गाडे यांनी हा निकाल दिला.
ज्यांच्याकडून पैसे उसने घेतले होते त्याला ही नुकसान भरपार्इ दोन महिन्यांत न दिल्यास एका महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद केले आहे. माणिक रामचंद्र बिर्ला असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत राजेंद्र व्यंकटराव कंदकुर्ते यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. बिर्ला याने तक्रारदाराला अनावश्यक न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला भाग पाडले. त्यामुळे आरोपीने तक्रारदाराला भरपाई दिली पाहिजे, असेही निकालात नमूद केले आहे. हा प्रकार तीन एप्रिल २०१४ रोजी घडला होता. या प्रकरणी वारजे येथे राहणाऱ्या एका ६३ वर्षीय व्यक्तीने बिर्ला याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.