पाटील, जाधव यांना स्नेहाधार गौरव पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील, जाधव यांना स्नेहाधार गौरव पुरस्कार
पाटील, जाधव यांना स्नेहाधार गौरव पुरस्कार

पाटील, जाधव यांना स्नेहाधार गौरव पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः स्नेहालय, अहमदनगर संचलित ‘स्नेहाधार पुणे परिवारा’तर्फे यंदाचा ‘स्नेहाधार गौरव पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव आणि राजश्री पाटील यांना जाहीर झाला. शनिवारी (ता. १८) सायंकाळी ५.३० वाजता एरंडवणे परिसरातील नवीन कर्नाटक हायस्कूलमधील शकुंतला शेट्टी सभागृह येथे पुरस्कार वितरण सोहळा होईल. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती स्नेहाधार पुणे प्रकल्पाच्या सहसंचालिका गौरी पाळंदे यांनी दिली. नंदिनी जाधव यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून २५०पेक्षा अधिक महिलांची अंधश्रद्धा दूर करून त्यांना जटामुक्त करण्याचे कार्य केले आहे. तर, राजश्री पाटील या विकलांग महिला कार्यकर्त्या असून दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी अमरावतीतील अचलपूर येथे कार्यरत आहेत.

संगीतोपचारांवर रविवारी विनामूल्य कार्यशाळा
पुणे, ता. १४ ः संगीत ही कला असली तरी संगीतोपचार म्हटल्यावर उपचार आणि करमणूक यामध्ये गल्लत होते. याविषयीचे भ्रम दूर करण्यासाठी आणि अधिक माहिती देण्यासाठी संगीतोपचार या विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेले डॉ. पं. शशांक कट्टी यांनी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ‘संगीत-उपचार की करमणूक?’ असे नाव असलेली ही सप्रयोग कार्यशाळा रविवारी (ता. १९) कोथरूड येथील कर्नाटक संघाच्या सिद्धार्थ टॉवर्स येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यामध्ये डॉ. पं. शशांक कट्टी आणि डॉ. संगीता सांगवीकर यांचा सहभाग आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.sursmt.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘अवयवदान जागृती हा महत्त्वाचा सामाजिक विषय’
पुणे, ता. १४ ः आज भारतात दोन लाख रुग्णांना किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची गरज असताना केवळ सहा हजार रुग्णांनाच ते उपलब्ध होते. हृदय प्रत्यारोपणाची गरज भासणाऱ्या ५० हजार जणांचा मृत्यू होत असताना केवळ १५ रुग्णांनाच हृदय उपलब्ध होते. त्यामुळे अवयवदानासंदर्भातील जनजागृती हा महत्त्वाचा सामाजिक विषय आहे, असे प्रतिपादन दिग्दर्शक राहुल पणशीकर यांनी केले. राहुल पणशीकर दिग्दर्शित ‘राख’ या लघुपटाच्या प्रदर्शनावेळी ते बोलत होते. याप्रसंगी फ्लिटगार्ड फिल्ट्रमचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, विपणन व ब्रँडिंग प्रमुख पीयूष श्रीवास्तव आदी उपस्थित होते. मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला हा लघुपट एका उतारवयातील यशस्वी उद्योजकाची अवयवदान जनजागृतीची तळमळ मांडतो.