
प्रशासकाचे कौतुक अन् नाराजीही
पुणे, ता. १४ : महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू असताना त्यावर नागरिकांनी चांगले आणि वाईट अनुभव सांगत कौतुक केले अन् नाराजी व्यक्त करत सुधारणा झाल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे.
महापालिकेवर प्रशासक येऊन एक वर्ष झाले. या काळात महापालिका आयुक्तांनी केलेल्या उपक्रमाबाबत पुणेकर खूष आहेत. चॉटबॉट सेवेमुळे नागरिकांना वेगात सेवा मिळत आहे. कात्रज भागात प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत डांबरीकरण, लाइट पोल, चेंबर लाइनचे काम व्यवस्थित होत आहे, शिवाय नगरसेवकांच्या काळात एक दिवसाआड पाणी येत होते आता पाणी नियमित येत असून, शहराचा कारभार प्रशासनाच्या हाती राहिला तर पुण्याचा विकास होईल.
- आशिष भोसले, कात्रज
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासक राजवटीने वर्षभर कारभार हाकला आहे. या राजवटीत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या तक्रारींचे निवारण प्रत्यक्षात कूर्मगतीने होत आहे. शहरातील मोठ्या प्रकल्पांना प्रत्यक्षात सुरुवात झाली, पण प्रशासक राजवटीत कारभाराचे वेगळेपण दिसले नाही.
- आदित्य गायकवाड, धनकवडी
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. परंतु राज्यकर्ते व अधिकारी यांच्याकडे नियोजन नसल्याने पाणीटंचाई होत आहे. महापालिका सर्व कामांत नापास झाली आहे. फक्त करवसुलीसाठी काम होते आहे.
- विलास नागरे, धायरी
प्रशासकीय राजला मर्यादा आहेत. करसवलतींचा पाठपुरावा, रस्ते रुंदीकरणासह इतर समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज आहे. बरेचसे माजी नगरसेवक मदत करतात पण, निवडणुका आवश्यक आहेत.
- स्मिता मोरे, नागरिक
पाणी, ड्रेनेज यासंबंधी प्रशासनाला कधी तक्रार केली नाही. पण रस्त्यातील खड्डे, राडारोडा, कचरा यासंदर्भात सोशल मीडियावरून तक्रारी केल्या. परंतु, त्यास प्रतिसाद मिळाला नाही.
- सोनाली गायकवाड, सिंहगड रस्ता