दिव्यांग जवानांसाठी सेवानिवृत्तीनंतरचा निधी

दिव्यांग जवानांसाठी सेवानिवृत्तीनंतरचा निधी

पुणे, ता. १५ ः सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या निधीचे नियोजन करून पुढील आयुष्यासाठी तरतूद करणे. तसेच उर्वरित आयुष्य कुटुंबासोबत आनंदात जगणे, हे मध्यमवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचे स्वप्न असते. मात्र याला अपवाद ठरल्या त्या मुख्य पोस्टमास्टर जनरल (मुंबई) मधून विभाग पर्यवेक्षक या पदावरून निवृत्त झालेल्या ६१ वर्षीय स्नेहा चव्हाण. लष्करात जाता आले नाही; पण लष्करासाठी असलेला आदर जपत स्नेहा गिरीश चव्हाण यांनी माणुसकीचे उदाहरण समाजासमोर मांडले आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात १९४२ च्या आंदोलनात अवघ्या १७ वर्षांच्या बाबूराव तवटे यांनी सहभाग घेतला. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या मुलीने लष्कराच्या जवानांसाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांनी निवृत्तीनंतर वैयक्तिक जीवन विमा पॉलिसीमधून मिळालेला निधी खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरला (पीआरसी) सुपूर्द केला. युद्धात हात किंवा पाय गमावलेल्या जवानांचे पुनर्वसन ‘पीआरसी’मध्ये केले जाते. या केंद्रात दिव्यांग जवानांना नियमित व्यायाम आणि विविध खेळांबरोबर कलागुण जपण्यावर भर दिला जातो. त्यांना आवश्‍यक त्या साधनांचा पुरवठा व्हावा, या अनुषंगाने चव्हाण यांनी हे मदतकार्य केले आहे.
स्नेहा चव्हाण या माहीम येथील रहिवासी आहेत. त्या सांगतात, ‘‘वडिलांनी स्वातंत्र्याच्या काळात केलेले योगदान तसेच स्वातंत्र्यानंतरही वडिलांनी ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’मार्फत देशहितासाठी सामाजिक कामे सुरू ठेवली. स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या लष्करी जवानांच्या कामगिरीचा जीवनावर प्रभाव झाला होता. त्यामुळे कुटुंबात लष्कराचे वातावरण नसतानाही त्यांना भारतीय सैन्यदलात जाण्याची इच्छा होती. यासाठी राष्ट्रीय छात्र सेवेच्या प्रशिक्षणानंतर भोसला मिलिटरी कॉलेजमधून शिक्षण घेतले. परंतु काही कारणामुळे आवडत्या क्षेत्रात जाता आले नाही. पण जवानांसाठी काही तरी करावे, हे तेव्हापासूनच ठरविले होते. त्यामुळे निवृत्तीनंतर पाच लाख रुपयांचा निधी ‘पीआरसी’मधील दिव्यांग जवानांच्या सोयीसुविधांसाठी सुपूर्द केला.’’

कोणताही जोड व्यवसाय किंवा उद्योग, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही तिने तिच्या बचतीतून जमवलेली रक्कम या स्तुत्य कामासाठी वापरली. त्यामुळे आम्हाला तिचा अभिमान वाटतो. आता तिच्याप्रमाणे आणखी काही जणांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे समाजात छोटे परिवर्तन घडविणे, ही देखील कौतुकाची बाब आहे.
- गिरीश चव्हाण, स्नेहा यांचे पती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com