
कोथरूडमध्ये गुन्हेगारांना पिस्तुलासह अटक
पुणे, ता. १४ : पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
वैभव रामभाऊ तावरे (वय २३, रा. भोसले हाईट्स, धायरी) व आदित्य प्रकाश वाटविसावे (वय २३, रा. धायरी फाटा, वडगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तावरे आणि वाटविसावे हे दोघे पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ते दोघे कोथरूड भागात एका खानावळीजवळ थांबले असून, त्यांच्याजवळ पिस्तूल असल्याची माहिती कोथरूड पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी चौधर आणि दहिभाते यांना मिळाली.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता तावरे यांच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक बसवराज माळी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.