विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा
विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा

विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः पुणे महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे इयत्ता दहावी व बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी १० हजार ९२९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी आजपर्यंत तीन हजार २३५ जणांच्या बँक खात्यात थेट पाच कोटी ४५ लाख २५ हजार रुपये जमा झाले आहेत. अद्याप सात हजार ६९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना राबविण्यात येते. यामध्ये इयत्ता दहावीसाठी १५ हजार तर बारावीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, रात्रशाळेतील विद्यार्थी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ८० ऐवजी ७० टक्क्यांपेक्षा जास्त आणि ४० टक्के दिव्यांगत्व असलेले विद्यार्थी, कचरा वेचकाची मुले, बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे कर्मचारी, सर्व असंघटित कष्टकरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असतील तर त्यांनाही या योजनेसाठी अर्ज करता येतो.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी २१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इयत्ता अकरावी व पदवीचे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो.

यंदाच्या इयत्ता दहावीच्या आठ हजार ३२२ तर बारावी उत्तीर्ण झालेल्या दोन हजार ६०७ असे एकूण १० हजार ९२९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी तीन हजार २३५ जणांच्या बँक खात्यात पाच कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत. तर पाच हजार ४३४ अर्जांचे ऑडिट सुरू असून एक हजार ९२६ अर्जांची छाननी सुरू आहे. हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होऊन, सर्वांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.
- आर. आर. चव्हाण, समाज विकास अधिकारी