
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण
पुणे, ता. १४ : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकीजवळ घडली. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याला मारहाण करून परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे सोडून दिले. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
या संदर्भात शिवलिंग दिगंबर गायकवाड (वय ३०, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) याने फिर्याद दिली. त्यावरून विश्रामबाग पोलिसांनी पाच ते सहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवलिंगचा मावसभाऊ बसवंत माधव गायकवाड (वय २५) हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. तो ११ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास अभ्यासिकेतून घरी निघाला होता. त्या वेळी सेनादत्त पोलिस चौकीच्या परिसरात मोटारीतून आलेल्या पाच-सहा जणांनी बसवंतला अडवले. त्याला जबरदस्तीने मोटारीत बसवून शास्त्री रस्त्याने टिळक चौकाच्या दिशेने आरोपी पसार झाले.
दरम्यान, आरोपींनी बसवंत याला जबर मारहाण करून परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे सोडून दिले. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. विश्रामबाग पोलिस या तरुणाकडून माहिती घेत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक पाठविल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय निकुंभ यांनी सांगितले.