मराठीच्या पिछेहाटीला संकुचितपणा कारणीभूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठीच्या पिछेहाटीला संकुचितपणा कारणीभूत
मराठीच्या पिछेहाटीला संकुचितपणा कारणीभूत

मराठीच्या पिछेहाटीला संकुचितपणा कारणीभूत

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः साहित्य अकादमीच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांचा पराभव झाला. त्यामुळे अकादमीच्या स्थापनेपासून गेल्या ६९ वर्षांत एकही मराठी अध्यक्ष न लाभण्याचा परंपरा कायम राहिली. याबाबत ‘हा केवळ प्रा. पठारे यांचा पराभव नाही, तर मराठी साहित्यविश्वाचा पराभव आहे. मराठी साहित्यिकांचा संकुचितपणा, त्यांच्यातील असूया आणि एकीचा अभाव, मराठीशिवाय इतर भाषांमध्ये संपर्क नसणे, ही कारणे या पराभवाला कारणीभूत आहेत’, अशी प्रतिक्रिया विविध साहित्यिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
प्रा. पठारे यांना सर्वसाधारण परिषदेच्या ९७ मतांपैकी अवघी तीन मते मिळाली. विशेष म्हणजे, परिषदेवर चार मराठी प्रतिनिधी असताना तितकीही मते त्यांच्या पारड्यात पडली नाही, याबाबत साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले असता, त्यांना केवळ चारच मते मिळाली होती. त्यांचे प्रचार न करण्याचे धोरण याला कारणीभूत होते, असे मानले जाते. मात्र, प्रा. पठारे यांनी यंदा प्रचार करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली.
यामागची कारणमीमांसा करताना अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळावर यंदा बिनविरोध निवडून आलेले प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले, ‘‘अनेक मराठी साहित्यिक आपल्या कोशातच राहणे पसंत करतात. त्यांचे साहित्य इतर भारतीय भाषांमध्ये पोचलेले नसते, इतर भाषांमधील साहित्यिकांशी व वाचकांशी त्यांचा संपर्क नसतो. जनमानसातून आलेले हे लेखक असले तरी त्यांच्याशीच यांचा संबंध नसतो. ‘आपणच श्रेष्ठ’, असा संकुचितपणा यामागे असतो. निवडणुकीतील पराभव हा नैमित्तिक आहे. मराठी साहित्यविश्वाचा संकुचितपणा दूर होत नाही, तोवर देश पातळीवर आपल्या हाती ठोस काही लागणार नाही.’’ याबाबत प्रा. रंगनाथ पठारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

अध्यक्षपदी निवड झालेल्या कौशिक यांच्यापेक्षा प्रा. पठारे यांची साहित्यिक गुणवत्ता निश्चितच अधिक होती. अशा व्यक्तीला तीनच मते पडावीत, हे दुर्दैवी आहे. याचाच अर्थ अकादमीतील सदस्य गुणवत्तेवर मतदान करीत नाही. मात्र, त्याचवेळी आपले साहित्य देशभर पोहोचत नाही, मराठी साहित्याचा अनुवाद मोठ्या प्रमाणावर होत नाही, या कारणांचाही विचार करावा लागेल. मराठी माणूसच मराठी लेखकामागे उभे राहत नाही, हेही वास्तव आहे.
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

प्रा. पठारे यांना चार मराठी प्रतिनिधींपैकी तीनच मते मिळाली, याचा अर्थ मराठी साहित्यिकांमध्ये एकमत नव्हते. इतर दोन उमेदवारांना मिळालेली मते पाहता त्यांच्यातील एकजूट सहज दृग्गोचर आहे. मराठी माणूस मात्र मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत नाही, हे यांमुळे उघड झाले आहे. सगळे एकत्र येऊन मराठी लेखकाला अन्य भाषांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करत नाही, त्यातून हे दारुण चित्र उभे राहते.
- भारत सासणे, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्यिकांचे लेखन दर्जेदार आहे, पण ते साहित्यिक आणि त्यांचे लेखन देशातील २४ भाषांमध्ये खरोखर पोचले आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधले असता, पराभवाची करणे कळू शकतील. मराठी साहित्यिकांचे महाराष्ट्राबाहेरील साहित्य वर्तुळाशी स्नेहबंध कमी पडतात, हेही वास्तव आहे.
- नरेंद्र पाठक, अकादमीवरील शासन नियुक्त प्रतिनिधी