जिल्हा परिषदेचे कामकाजही ठप्प झेडपी मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेचे कामकाजही ठप्प
झेडपी मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
जिल्हा परिषदेचे कामकाजही ठप्प झेडपी मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

जिल्हा परिषदेचे कामकाजही ठप्प झेडपी मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी मंगळवारपासून (ता. १४) संपावर गेले आहेत. यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व कर्मचारी मुख्यालयात आले, पण कामकाज करण्यासाठी नव्हे तर, संपात सहभागी होत, धरणे आंदोलन करण्यासाठी आल्याचे दिसून आले. परिणामी, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कार्यालयात खातेप्रमुखच हजर तर, कर्मचारी कार्यालयाबाहेर, असे चित्र दिसले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी झेडपी मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. या संपाचा आज पहिलाच दिवस होता. १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या संपामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयातील अंतर्गत सर्व कार्यालयांतील कर्मचारी एकजुटीने सहभागी झाले आहेत. मात्र या संपामुळे मुख्यालयातील सर्व विभाग नियमितपणे सुरू असूनसुद्धा कार्यालयांत मात्र शुकशुकाट जाणवत होता.

या वेळी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, कोशाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्षा ‍मीनाक्षी मुदगुल, शाखा अभियंता संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मखरे, परिचर संघटनेचे अध्यक्ष मयूर येख्ये, लेखा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जामदार, रेखाचित्र संघटनेचे अध्यक्ष बंडोपंत शितोळे, वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सणस, औषधनिर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गोलांडे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.