महाविद्यालयांत आता ‘एनईपी कक्ष’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयांत आता ‘एनईपी कक्ष’!
महाविद्यालयांत आता ‘एनईपी कक्ष’!

महाविद्यालयांत आता ‘एनईपी कक्ष’!

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः महाविद्यालय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी २०२०) अंमलबजावणीसाठी एक स्वतंत्र कक्ष आणि अध्यापकांची नियुक्ती करण्यात येत आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर या कक्षाची भूमिका निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरीषदेने डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजे २०२३-२४ पासून चार वर्षाची पदवी अभ्यासक्रम असणार आहे. तसेच, स्वयंम पोर्टल आणि एमओओसी (मॉक) अंतर्गत २० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना करता येणार आहे. एनईपीच्या पार्श्वभूमीवर रोज होऊ घातलेल्या बदलांची अंमलबजावणीसाठी हा कक्ष प्रत्येक महाविद्यालयाने तयार करणे गरजेचे आहे. कक्षाद्वारे शैक्षणिक धोरण समजून घेत, अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्याचे कार्य करण्यात येणार आहे.

नव्या बदलांवर समित्या
ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडिट, मल्टिपल एन्ट्री ॲण्ड एक्झिट, मुक्त व दूरशिक्षण, कार्यानुभव आधारित पदवी कार्यक्रम, भारतीय भाषा, भारतीय ज्ञान पद्धती, संयुक्त पदवी, दुहेरी पदवी, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस, संशोधन व विकास कक्ष, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा प्रवेश या बदलांसाठी समित्या कार्यरत आहे.

विद्यापीठाने उचललेली पावले
- ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडिटमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे खाते तयार
- तीनही जिल्ह्यात समनव्यकांची नेमणूक करण्यात आली
- ‘एनईपी’च्या दृष्टीने प्राथमिक माहिती देणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन
- महाविद्यालयांना नॅक ॲक्रिडेशन करण्याच्या सूचना

बदलांची टाइमलाइन (शैक्षणिक वर्ष)
२०२३-२४ ः चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू
२०२५-२६ ः पदवीचे चौथे वर्षाची अंमलबजावणी
२०२६२७ ः पदव्युत्तर पदवी एक वर्षाची होणार (मास्टर कोर्स)

आकडे बोलतात
- कार्यशाळांचे आयोजन करणारी महाविद्यालये ः १७०
- २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ‘एनईपी’साठीची तरतूद ः १०,०००

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालय स्तरावर एनईपी कक्ष स्थापन केले जात आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचेही नव्या बदलाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर जागृती होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठ स्तरावर मार्गदर्शक पद्धती विकसित करण्यात येत आहे. एनईपीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने स्वायत्त महाविद्यालयांनी अग्रेसर भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
-डॉ. नितीन करमळकर, अध्यक्ष, सुकाणू समिती, एनईपी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांतील समन्वयक अध्यापकांची कार्यशाळा घेतली आहे. लवकरच अभ्यासमंडळांची बैठक घेत, अभ्यासक्रमाचीही निश्चिती करण्यात येईल.
- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ