
अन्न गिळण्यासाठी त्रासदायक ठरणारा ‘डिसफॅगिया’
पुणे, ता. १५ : ‘‘काही खायचं म्हणजे लोकांना आनंद होतो. पण, मला भयंकर दडपण येतं. त्यातही एखाद्या समारंभात सगळ्यांबरोबर जेवण तर मी टाळतोच. कार्यालयातही सहकाऱ्यांबरोबर चहा-पाण्याला जात नाही. याचं एकच कारणं म्हणजे डिसफॅगिया हा आजार. माझं आयुष्य बदलून गेलंय या आजारानं. खाणं-पिणं कमी झालंच पण, मानसिक ताण वाढला,’’ हे बोलताना वाहन उद्योगात काम करणाऱ्या शरद कामठे यांचा उतरलेला चेहरा स्पष्ट जाणवत होता.
डिसफॅगिया म्हणजे अन्न गिळण्याचा आजार. या बद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १६ मार्च हा डिसफॅगिया दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने कामठे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘‘आधी हा त्रास नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जेवणावरची इच्छा उडाली, असे म्हणण्यापर्यंत परिस्थिती बिघडली आहे.’’
‘‘जेवणाचा आनंद घेता येत नाही, हा या आजाराचा सर्वांत वाईट भाग आहे. अन्न व्यवस्थित चावले जात नसल्याने वारंवार खोकला येतो, असा गैरसमज यात असतो. त्यामुळे डिसफॅगियाच्या निदानाकडे दुर्लक्ष होते,’’ असे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीच्या सहायक अध्यापक अप्पास साहा यांनी सांगितले. डॉ. पल्लवी केळकर म्हणाल्या, ‘‘या प्रकारचे रुग्ण आपले कुटुंब आणि समाजाशी संपर्क गमावतात. सगळ्यांबरोबर जेवण करता येत नाही. त्यामुळे दुरावा निर्माण होतो. याचा दूरगामी परिणाम त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर होतो.’’
डिसफॅगिया म्हणजे काय?
या आजाराच्या रुग्णाला अन्नपदार्थ चावताना किंवा गिळताना समस्या निर्माण होतात. बिस्कीटासारखा घन किंवा ज्यूससारखा द्रवपदार्थ खाता येत नाही.
काय होते?
डिसफॅगियामुळे चावलेले पदार्थ अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वासनलिकेत जातात. त्यातून रुग्णाला अचानक ठसका लागतो. तसेच श्वास घ्यायला त्रास होतो.
हे आहेत धोके
- मानसिक ताण वाढण्याची शक्यता
- अर्धांगवायू उद्भवण्याचा धोका
- न्यूमोनिया
काय आहेत उपचार?
- कमकुवत स्नायू सुधारण्यासाठी व्यायाम
- अन्न चावणे व गिळण्याच्या पद्धतीत बदल
- त्यासाठी स्वतंत्र थेरपी उपलब्ध
डिसफॅगियाच्या रुग्णांचे अचूक निदान आणि त्यांच्यावर प्रभावी उपचार आवश्यक ठरतो. या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी ‘स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट’ अनेक साधने वापरतात. रुग्णाला अन्नपदार्थ सुरक्षितपणे गिळता यावे, यासाठी विविध प्रकारचे व्यायाम सुचविले जातात. तसेच, अन्नपदार्थांमध्ये बदल केला जातो.
- प्रिया कपूर, सहायक अध्यापक, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी