
चुकवू नये असे काही
१) ‘फोर स्ट्रोक्स’
‘फोर स्ट्रोक्स’ या चार चित्रकारांच्या एकत्रित चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अस्मिता घाटे, विनायक माढेकर, चित्तरंजन पटवर्धन आणि गायत्री भारद्वाज या कलाकारांचा सहभाग असून यात जलरंग, तैलरंग, ॲक्रीलिक, पेन्सिलिंग या माध्यमांतील चित्रे पाहायला मिळतील.
कधी ः गुरुवार (ता. १६) ते मंगळवार (ता. २१)
केव्हा ः सकाळी ११ ते सायंकाळी ८.३०
कुठे ः पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड कलादालन, पहिला मजला, हॅपी कॉलनी, कोथरूड
२) ‘झेप - चित्र प्रदर्शन’
वुमन्स आर्टिस्ट ग्रुपतर्फे ‘झेप’ या तीन दिवसीय वार्षिक चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनात दररोज सकाळी व सायंकाळी सहभागी कलाकार कला प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता माजी नगरसेविका मनिषा कदम, उद्योजक प्रीत बाबेल, ज्येष्ठ चित्रकार दिलीप कदम यांच्या हस्ते होणार आहे.
कधी ः शुक्रवार (ता. १७) ते रविवार (ता. १९)
केव्हा ः सकाळी १०.३० ते रात्री ८
कुठे ः बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता
३) ‘माज्या जल्माची चित्तरकथा...’
शिक्षणविवेक आणि टी. बी. लुल्ला फाउंडेशनतर्फे ‘शिक्षण माझा वसा २०२३’ या उपक्रमांतर्गत ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ या दीर्घांकाचे सादरीकरण होणार आहे. पहिल्या दलित स्त्री आत्मकथनकार शांताबाई कांबळे यांचा ‘शिक्षक ते शिक्षणाधिकारी’ असा प्रवास उलगडून दाखविणारा हा दीर्घांक आहे. अभिनेते योगेश सोमण यांनी या दीर्घांकाचे संपादन आणि दिग्दर्शन केले आहे.
कधी ः रविवारी (ता. १९)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय
४) ‘जाऊ देवाचिया गावा’
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘जाऊ देवाचिया गावा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘मोगरा फुलला’ ते ‘अवघा रंग एक झाला’ अशा विविध संत रचनांचे व्हायोलिनवर सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निरूपण डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे असून या संतरचना व्हायोलिनवर अनुप कुलथे सादर करणार आहेत.
कधी ः रविवार (ता. १९)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता