
लुटणाऱ्या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी
पुणे, ता. १५ : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ४६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला. ललित दीपक खोल्लम (वय २८) आणि मयूर दिलीप राऊत (वय २१, रा. गहुंजे) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना जबरी चोरी, अपहरण आणि इतर कलमांनुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत चंदन राजकुमार शर्मा (वय २०, रा. आंबेगाव) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १३ ऑगस्ट २०१५ च्या रात्री पुणे-बंगळुर महामार्गावर हा प्रकार घडला होता. फिर्यादी यांना आंबेगावला जायचे असल्याने ते पुणे-बंगळुर महामार्गावर पी. के. बिर्याणी हॉटेलजवळ थांबले होते. त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख ५० हजार रुपये आणि, दोन मोबाईल असा मिळून ७१ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरला. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास ‘तुझा जीव घेऊ’ अशी धमकी देऊन त्याला चांदणी चौक येथे सोडून निघून गेले होते.