
बेकायदा वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी तरुणाला अटक
पुणे, ता. १५ : पुण्यात आठ वर्षांपासून बेकायदा वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट तयार करून दुबई प्रवास केल्याचे समोर आले आहे.
महम्मद अमान अन्सारी (वय २२, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी विशेष शाखेचे पोलिस कर्मचारी केदार जाधव यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेत असताना महम्मद अन्सारीबाबत माहिती मिळाली. चौकशीदरम्यान, तो बेकायदा वास्तव करीत असल्याचे आढळले. महम्मदची आई मूळ भारतीय आहे. तिचा पाकिस्तानी नागरिक अमान यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्या पाकिस्तानला गेल्या. परंतु कौटुंबिक वादातून आई युएईमध्ये वास्तव्यास आहे. तिने महम्मदसह तिघा भावंडांना २०१५ मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आजीकडे पाठविले होते. पुण्यात शिक्षण घेत असताना महम्मद याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवला. त्या आधारे तो आईला भेटण्यासाठी गेल्याचे समोर आले आहे.
कौटुंबिक वादामुळे पुण्यात वास्तव्य
आई युएईमधील एका कंपनीत एचआर विभागात नोकरीस आहे. परंतु कौटुंबिक वाद आणि युएईमधील खर्च परवडत नसल्यामुळे तिने महम्मदसह तिघा भावंडांना पुण्यात शिक्षणासाठी पाठविले होते. दर महिन्याला आई महम्मदला शिक्षणासाठी काही रक्कम पाठवत होती. त्याने भारतात वास्तव्याचा कालावधी वाढविण्याबाबत परदेशी नागरिक नोंदणी कक्षाकडे अर्ज केला होता. परंतु त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पुढील तपास खडकचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे करीत आहेत.