‘पीएमपी’च्या खर्चात बचत!

‘पीएमपी’च्या खर्चात बचत!

पुणे, ता. १५ ः पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या बसच्या संख्येत वाढ केली आहे. रोज ४० मार्गांवर ४५ बस मुक्कामी जात आहे. त्यामुळे बसच्या प्रवासात किलोमीटरची पर्यायाने इंधनाची बचत होत आहे. रोज ‘पीएमपी’च्या सुमारे दीड हजार किलोमीटरची बचत होत आहे. शिवाय मुक्कामी जाणाऱ्या बसला चांगले उत्पन्न देखील मिळत आहे.

पीएमपी प्रशासन उत्पन्न व खर्च यांच्यात ताळमेळ बसविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. मुक्कामी जाणाऱ्या बसच्या संख्येत वाढ करणे हा त्यातलाच एक भाग आहे. मुक्कामी बसची संख्या वाढविण्यापूर्वी पीएमपी प्रशासन ग्रामीण भागात सकाळी लवकर बस सोडत. सकाळी ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी राहते. मात्र सकाळच्या वेळी ग्रामीण भागातून शहरांत येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. तसेच रात्री शहरी भागातून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. हे लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने रात्री दहाच्या सुमारास जाणाऱ्या बसला ग्रामीण भागात मुक्कामी राहण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पुण्यातून ग्रामीण भागात जाताना व ग्रामीण भागातून सकाळी पुण्यात येणाऱ्या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. शिवाय इंधनाच्या खर्चात देखील बचत होत आहे. ४५ बसच्या माध्यमातून रोज किमान दीड हजार किलोमीटरची बचत होत आहे.

चालक व वाहकाच्या भत्त्यात वाढ
पूर्वी पीएमपी प्रशासनाने २५ मार्गावर ३० गाड्या मुक्कामी सोडल्या होत्या. मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्यावर बसच्या संख्येत व मार्गात वाढ केली आहे. आता ४० मार्गावर ४५ गाड्या धावत आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. कर्मचारी देखील मुक्कामी जाण्यासाठी सहज तयार व्हावे याकरिता त्यांच्या भत्त्यात वाढ केली आहे. पूर्वी एका मुक्कामासाठी चालक व वाहकांना ५० रुपये भत्ता मिळत. आता तो वाढवून १०० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.

ही आहेत मुक्कामाची ठिकाणे
लोणावळा, सासवड, सारोळा, खानापूर, राजगुरुनगर, पौड, आळंदी,आदी ठिकाणी पीएमपीच्या बस मुक्कामी जात आहे. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत राहिला तर अन्य मार्गावरच्या मुक्कामाच्या बसच्या संख्येत वाढ केली जाऊ शकते.

मागील काही दिवसांत मुक्कामी जाणाऱ्या बसच्या संख्येत वाढ केली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मुक्कामी जाणाऱ्या बसमुळे पीएमपीच्या खर्चात देखील बचत होत आहे.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com