
पत्नीसह मुलाचा खून करून आयटी अभियंत्याची आत्महत्या
पुणे/औंध, ता. १५ : पत्नी आणि निरागस मुलाचा खून करून एका आयटी अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औंध परिसरात घडली. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला.
सुदिप्तो चंद्रशेखर गांगुली (४४), प्रियांका सुदिप्तो गांगुली (४०) आणि तनिष्क सुदिप्तो गांगुली (८) अशी मृतांची नावे आहेत. सुदिप्तो याने पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदिप्तो यांचा बंगळूर येथील लहान भाऊ सिध्दार्थो यांनी मंगळवारी भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु दिवसभर संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी मित्राला भावाच्या घरी पाठवून माहिती घेण्यास सांगितले. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे मित्राने मंगळवारी रात्री चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तिघेजण हरवल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी फोनच्या लोकेशनवरून तपास केला असता ते राहत असलेल्या नताशा सोसायटीत माग मिळाला. पोलिस सोसायटीत पोचले असता त्यांना सदनिकेचा दरवाजा बंद आढळला. एका खोलीमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. तर, दुसऱ्या खोलीत सुदिप्तो यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सुदिप्तोची पत्नी आणि मुलाचा चेहरा प्लास्टिकच्या रॅपरने बांधलेला होता.
आयटीमधील नोकरी सोडून भाजीविक्री
सुदिप्तो यांना आयटी कंपनीत चांगले पॅकेज होते. परंतु त्यांनी आठ महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती. ते ऑनलाइन भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. पत्नी प्रियांका उच्चशिक्षित होती. ते आर्थिक अडचणीत आहेत का, याविषयीही कधी सांगितले नसल्याचे त्यांचे भाऊ सिध्दार्थो गांगुली यांनी सांगितले.
आर्थिक अडचणीतून घडला प्रकार
व्यवसायात तोटा झाल्यामुळे आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याची दाट शक्यता आहे. घटनास्थळी डायरी सापडली परंतु त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यांचे मोबाईल जप्त केले असून, त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण यांनी सांगितले.