
पुण्याहून १०० हून अधिक उड्डाणे विमानतळावर लवकरच समर शेड्यूल; नवी शहरे जोडण्यावर भर
पुणे, ता. १६ : यंदाच्या उन्हाळी हंगामात (समर शेड्यूल) पुणे विमानतळावरून विमानांची सर्वाधिक उड्डाणे होणार आहेत. यामध्ये साधारण १०० हून अधिक उड्डाणे होण्याची शक्यता असून, प्रवासी संख्यादेखील चाळीस हजारांच्या घरात पोचेल असा अंदाज आहे. या शेड्यूलमध्ये केवळ उड्डाणांची संख्या वाढविण्यात आली असे नाही तर नव्या शहरांची कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर दिला आहे. विमानतळाने अद्याप अधिकृतपणे समर शेड्यूल जाहीर केलेले नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी विमानांची वाहतूक २०० हून अधिक असणार आहे.
देशातील प्रमुख विमानतळांचे समर शेड्यूल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होते. कोची, नाशिकसह अन्य विमानतळांनी ते जाहीर केले आहे. पुणे विमानतळाचे समर शेड्यूल २६ मार्च ते २८ ऑक्टोबरदरम्यान असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून वाराणसी येथे पहिल्यांदाच विमानसेवा सुरू होत आहे. तसेच अन्य शहरांचाही यामध्ये समावेश आहे.
पुणे-मुंबईसाठीही स्लॉट
गेल्या आठ वर्षांपासून पुणे-मुंबई विमानसेवा बंद आहे. ती सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी एअर इंडियाने विंटर शेड्यूलमध्ये सकाळचा स्लॉट दिला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने १५ दिवसांनी विमानतळ प्रशासनाने तो स्लॉट रद्द केला. यंदाच्या समर शेड्यूलमध्येही पुणे-मुंबईसाठी स्लॉट दिला जाण्याची शक्यता अधिक आहे. विमान कंपनीने त्यास चांगला प्रतिसाद दिला तर आठ वर्षांपासून बंद झालेली विमानसेवा पुन्हा सुरू होऊ शकते. विमानसेवा सुरू झाल्यावर पुणे-मुंबई प्रवासास अवघे २५ मिनीट लागतील.
कसे असेल समर शेड्यूल
उड्डाणे : १०९ हून अधिक
एकूण विमानांची वाहतूक : २१८
प्रवासी संख्या : ४० हजार
सीआयसीएफ जवानांची संख्या : ४४५
पुणे विमानतळाचे समर शेड्यूल अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. मात्र प्रवाशांची सोय होईल, याचा पूर्ण विचार केला आहे. उड्डाणाची संख्या वाढेल अशी आशा आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे