फेसलेस पद्धतीने मिळणार शिकाऊ वाहन परवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेसलेस पद्धतीने मिळणार
शिकाऊ वाहन परवाना
फेसलेस पद्धतीने मिळणार शिकाऊ वाहन परवाना

फेसलेस पद्धतीने मिळणार शिकाऊ वाहन परवाना

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः एखाद्या नागरिकाकडे वाहन चालविण्याचा परवाना असेल आणि त्याला दुसऱ्या वाहन प्रकाराचा शिकाऊ परवाना हवा असेल तर, त्यासाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची गरज राहणार नाही. त्याला ऑनलाइन पद्धतीने तो परवाना मिळू शकेल. परिवहन खात्याने या बाबत ट्रायल सुरू केली असून अल्पावधीतच या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, कार्याध्यक्ष विवेक खाडे, प्रवक्ते प्रवीण महांकाळ, उपाध्यक्ष अनंत कुंभार आदींनी परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी भिमानवार यांनी परिवहन खात्याकडून या बाबतची ट्रायल एनआयसीकडून सुरू असून सर्वच नागरिकांसाठी वाहन परवाना असलेल्या नागरिकांना अन्य संवर्गातील ऑनलाइन पद्धतीने शिकाऊ वाहन परवाना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच लायसन्स नूतनीकरण, दुबार प्रत, नाव किंवा पत्ता बदलणे यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करावा, ही असोसिएशनची मागणीही परिवहन आयुक्तांनी मान्य केल्याची माहिती घाटोळे यांनी दिली. या प्रसंगी असोसिएशनचे भारती पाटील, अबोज शिंदे, आशिष पवार, मामासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

असा होणार फायदा...
एखाद्या नागरिकाकडे दुचाकीचा वाहन चालविण्याचा परवाना आहे आणि त्याला चारचाकी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना हवा असेल तर, त्यासाठी त्याला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्यात त्याचा वेळही जातो आणि खर्चही वाढत होता. दिल्लीसह देशातील आठ शहरांत वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या नागरिकांना दुसऱ्या संवर्गातील शिकाऊ वाहन परवाना ऑनलाइन पद्धतीने दिला जातो. राज्यातही या पद्धतीची अंमलबजावणी सुरू केल्यास त्याचा एकूण सहा कोटी १६ लाख ११ हजार ५२० नागरिकांना फायदा होणार आहे.