युवक काँग्रेसचा सोमवारी विधिमंडळाला घेराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवक काँग्रेसचा सोमवारी 
विधिमंडळाला घेराव
युवक काँग्रेसचा सोमवारी विधिमंडळाला घेराव

युवक काँग्रेसचा सोमवारी विधिमंडळाला घेराव

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : युवकांमधील बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २० मार्च रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घेराव आंदोलनामध्ये राज्यभरातून २० ते २५ हजार युवक सहभागी होतील, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

सिंग म्हणाले, ‘‘युवक आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीच्या या लढाईत राज्याच्या प्रत्येक तालुक्यातून तरुण सहभागी होणार असून, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यात सहभागी होणार आहेत. भारताच्या तरुणांना प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सीमित करण्याच्या मोदी-अदानी युतीच्या षड्‍यंत्राला जाब विचारण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.’’

तर राऊत म्हणाले, ‘‘राज्य सरकारचे युवकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. महाभरती, एमपीएससी यासोबतच विद्यार्थी आणि युवकांबद्दल राज्य सरकार चुकीची धोरणे राबवित आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. परिणामी बेरोजगारी वाढत आहे. इतर राज्यांत बेरोजगार भत्त्याची तरतूद आहे. ही तरतूद महाराष्ट्रातही व्हायला हवी. पण महाराष्ट्र सरकारचे बेरोजगारांसाठी धोरणच नाही. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात युवकांसाठी कोणतीही भरीव तरतूद नाही. केवळ जनतेकडून करवसुली करायची, हेच सरकारचे धोरण दिसते.’’

या वेळी प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रशांत ओगले, महिला उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, अक्षय जैन, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, शहराध्यक्ष राहुल शिरसाठ आदी उपस्थित होते.