कारवाया करूनही कचराच!
पुणे, ता. १६ ः पुणे शहर व परिसरात विविध ठिकाणी थेट कचरा टाकण्यात येतो. काही ठिकाणी तर पुणे महानगरपालिकेच्या सूचनांचे फलक लाऊन देखील त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. तर मार्च महिन्यात केवळ १४ दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या प्रकारांमध्ये महापालिकेद्वारे ५५० हून अधिक दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
नुकतेच लोहगाव परिसरात वडगाव शिंदे रस्ता येथे अशाच प्रकारे महापालिकेचे सूचना फलक असून ही मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला होता. त्याबाबत हिमांशू उपाध्याय या नागरिकाने ट्वीट केले होते. दरम्यान महापालिकेच्या सूचना असून ही तेथे कचऱ्याचा ढीग साचल्याने, नागरिक अशा सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले. त्यावर माहापालिकेने त्वरित कारवाई केल्याचे सांगितले.
पुणे महापालिकेच्या वतीने मागील अकरा महिन्यांत (एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३) सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे अशा विविध प्रकारातील एकूण १८ हजारांपेक्षा अधिक कारवाया करण्यात आल्या. त्याद्वारे एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. तर मार्च महिन्यात १४ दिवसांमध्ये महापालिकेद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, प्लास्टिक कारवाई, बांधकाम राडारोडा, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे अशा विविध प्रकारच्या गोष्टींसाठी ७०० हून अधिक कारवाया करण्यात आल्या असून त्यातून साडेतीन लाखाहून अधिक दंड प्राप्त करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या व महामार्गालगत कचरा टाकणे आणि वेळेत तो कचरा न उचलला जात असल्याने तो खुल्यात जाळण्याचे प्रकार यामुळे प्रदूषणात भर पडत आहे.
बाणेर, बावधान, पाषाण, सुस रस्ता, जांभूळवाडी, कात्रज परिसरातील महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा टाकण्यात येत आहे. कामानिमित्त अनेकवेळा या मार्गांवरून जावे लागते. दरम्यान महापालिकेद्वारे हा कचरा न उचलल्यामुळे नागरिकांद्वारे हा कचरा तसाच उघड्यावर जाळण्यात येत आहे. यामध्ये घरगुती वस्तू, कचरा तसेच महामार्गावर असलेल्या हॉटेल व इतर आस्थापनेतील कचऱ्याचा समावेश आहे. यामुळे श्र्वान देखील या कचऱ्या भोवती आढळतात. त्यामुळे बऱ्याचदा श्र्वानांचा धोका व अपघाताची शक्यता असते.
- आरिफ जमादार, नागरिक (वारजे परिसर)
बऱ्याच ठिकाणी महापालिकेचे फलक लावून देखील नागरिकांद्वारे तेथे कचरा टाकला जात आहे. यातून नागरिकांची मानसिकता दिसते. कचरा टाकण्यासाठी सुविधा देखील उपलब्ध आहेत, यासाठी कचरा संकलनाकरिता वाहनांची व्यवस्था आहे. मात्र तरी देखील असे प्रकार घडतात. उघड्यावर कचरा टाकण्याचे सर्वाधिक प्रकार उपनगरांमध्ये होतात. त्यावर महापालिकेमार्फत वेळोवेळी कारवाई सुद्धा करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे कचरा टाकण्याचे शहर व उपनगरांमध्ये असे सुमारे ६५० ठिकाण आहेत.
- अशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
आत्तापर्यंत ८३ कारवाया
महापालिकेच्या वतीने १२ जानेवारी ते १५ मार्च २०२३ या कालावधीत महामार्गालगत टाकण्यात आलेल्या कचऱ्यासाठी ८३ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाया स्वामी नारायण मंदिर नऱ्हे ते चांदणी चौक, कात्रज महामार्ग ते बाणेर सेवा रस्ता, कात्रज ते वाकड पूल, बालेवाडी ते कात्रज, बावधन सेवा रस्ता, वारजे आदी मार्गांवर करण्यात आल्या असल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाद्वारे सांगण्यात आले.
समस्या काय ?
- सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषण व दुर्गंधी
- यामुळे विविध आजारांची शक्यता
- खुल्यात कचरा जाळल्याने त्याद्वारे हवेच्या प्रदूषणाचा धोका
- दंडात्मक कारवाया होत असून ही ही समस्या कायम
१ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत महापालिकेने केलेल्या दंडात्मक कारवाईची स्थिती
प्रकार ः दंडात्मक कारवाई ः दंड (रुपयांमध्ये)
सार्वजनिक ठिकाणी कचरा/अस्वच्छता करणे ः १५७९९ ः ५६ लाख ५३ हजार ८५
पाळीव प्राण्यांमुळे होणारी अस्वच्छता ः १३६ ः २८ हजार ८०
एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत
- विविध प्रकारच्या कारवाया ः १८७०६
- दंड (रुपयांमध्ये) ः १ कोटी २२ लाख ७३ हजार ५८५
१ ते १४ मार्च २०२३ पर्यंत
- एकूण कारवाई ः ७१७
- दंड (रुपयांमध्ये) ः ३ लाख ५५ हजार ७०