
अपुऱ्या माहितीवरून कोणाला ‘डॅमेज’ करू नका! चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना विधानसभेत बजावले
पुणे, ता. १६ : ‘‘अपुऱ्या माहितीवर आधारित विधाने करून अनेक वर्षे सामाजिक काम करणाऱ्यांना ‘डॅमेज’ करू नका,’’ असे बजावत संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दलच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. अपुऱ्या माहितीवर आधारित विधाने करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
‘‘विधिमंडळात मंत्री उपस्थित नसतात, त्यांना कामकाजात रस नसेल तर त्यांनी पद सोडावे,’’ अशा आशयाचे वक्तव्य पवार यांनी विधिमंडळात बुधवारी केले. तसेच मंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दलही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर विधानसभेत स्पष्टीकरण करताना पाटील म्हणाले, ‘‘मी सभागृहात उपस्थित नाही, असे म्हटले गेले. परंतु, त्यावेळी अर्थसंकल्पावर विधान परिषदेत चर्चा सुरू होती. शिक्षण मंत्री दीपक केसरकर वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर गेले होते. त्यामुळे तेथे उपस्थित राहण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितले होते. विधिमंडळातील काम जास्त आहे म्हणून कामकाजाची वेळ वाढविण्यात आली आहे. विधानसभेचे सकाळी ९ वाजता तर, विधान परिषदेचे सकाळी ९. ३० वाजता कामकाज सुरू होते. त्यात मी सकाळी ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत सहभागी असतो. त्यामुळे अपुऱ्या माहितीवर पवार यांनी विधाने करू नयेत.’’
विधिमंडळात दोन्ही सभागृहांचे कामकाज रात्री उशिरापर्यंत चालते. त्यामुळे मंत्र्यांना लक्षवेधी उशिरा समजते. त्यावर अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यास वेळ लागतो, ही अडचणही समजून घ्यायला हवी. विविध कामांच्या बैठकांनिमित्त पाच मंत्री बाहेर असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले...
- अजितदादा, आपल्या इतके नाही परंतु, पुरेसे काम मी करतो
- सामाजिक कामात मी १९८० पासून सक्रिय सहभागी आहे
- गेल्या ४५ वर्षांतील १३ वर्षे पूर्णवेळ विनावेतन काम केले
- जिल्हास्तरावरून काम करीत राष्ट्रीय स्तरावर पोचलो आहे
- आरोप करून एखाद्याचे सामाजिक काम ‘डॅमेज’ करू नका