अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाला अटक
अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाला अटक

अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : मुलीला पोलिस बनवायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यात आलेल्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाला शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली.
अंकुश राजेंद्र राख (रा. हाजीपूर पो. ब्रम्हागाव ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या कंटेनरचालकाचे नाव आहे. तर, या अपघातात सुरेश सखाराम गवळी (वय ५३, रा. रमाबाई आंबेडकरनगर, नाशिक) यांचा मृत्यू झाला होता. गवळी हे व्यवसायाने रिक्षाचालक होते. ते मुलीच्या पोलिस भरती प्रक्रियेसाठी पुण्यात आले होते. त्यांनी रात्री शिवाजीनगर परिसरात एका फुटपाथवर मुक्काम केला. १३ मार्च रोजी पहाटे मुलीला शिवाजीनगर मैदानावर सोडून ते चहा घेण्यासाठी एचपी पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव कंटेनरने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये हा कंटेनर बाबा रोडवेज जालना येथील (क्रमांक एमएच- २१ बीएच-३३६९) असल्याचे आढळून आले. हा चालक जालना येथून १६ मार्च रोजी वाघोली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस हवालदार रणजित फडतरे, अतुल साठे यांनी वाघोली वजन काट्याजवळ सापळा रचून कंटेनरचालकाला ताब्यात घेतले.