
साडेसात टन बाटल्यांचे पुणेकरांकडून संकलन
पुणे, ता. १७ ः पुणेकरांनी आतापर्यंत १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सात टन ६८ किलो प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. नागरिकांचा वाढता प्रतिसाद बघता या उपक्रमाची मुदत २ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वांत जास्त प्लास्टिक बाटल्यांचे संकलन झाले आहे.
पुणे महापालिकेने प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेचे आयोजन केले आहे. कमिन्स इंडिया संस्थेच्या सहकार्याने या स्पर्धेतील विजेत्यांना इलेक्ट्रिक बाईक, स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी बक्षीस दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी १५ मार्च अखेरची मुदत होती; पण आता ही मुदत २ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. महापालिकेने अधिकृत केलेल्या रिसायकलर्स किंवा प्रोसेसर्सकडे संकलित झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्या देऊन त्यापासून आकर्षक म्युरल्स, पेव्हर ब्लॉक्स, इंटरलॉकिंग ब्लॉक्स आदी साहित्य बनवून शहरातील रस्ते, उद्यानात ते ठेवून सुशोभीकरण केले जाणार असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.