
आणि कामावर पडला अखेर खरा ‘प्रकाश’!
‘‘नमस्कार, मी वेदिका! ’’ मृदू आवाजात बॅंकेतील खिडकी पलीकडे बसलेल्या प्रकाशला वेदिकाने म्हटले.
‘‘तुम्ही आधी रांगेत या. एवढी लोकं काय मुर्ख म्हणून रांगेत उभी आहेत का? आणि तुम्ही एकट्याच शहाण्या आहात का?’’ खिडकी पलीकडून प्रकाश खेकसला.
‘‘अहो, माझं वेगळं काम आहे.’’ वेदिकाने म्हटले.
‘‘वेगळं म्हणजे जगावेगळं आहे का? काहीही थापा मारू नका. तुम्ही मुकाट्याने रांगेत या. नाहीतर तुमचं काम होणार नाही.’’ प्रकाशने इशारा दिला.
‘‘अहो, तुम्हीच मला बॅंकेत बोलावलं होतं.’’ वेदिकाने विचारले.
‘‘मी बोलावलं होतं. खातेक्रमांक सांगा.’’ प्रकाशने विचारले.
‘‘अहो, तुमच्या बॅंकेत माझं खातं नाही.’’ वेदिकानं म्हटले.
‘‘खातं नाही. मग काय टाईमपास म्हणून बॅंकेत आलाय काय? की आमची बॅंक तुम्हाला प्रेक्षणीय स्थळ वाटली?’’ प्रकाश पुन्हा खेकसला.
‘‘गेल्या आठवड्यात तुम्ही मला बघायला आला होतात. त्यानंतर भेटण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेना म्हणून तुम्ही शेवटी बॅंकेत बोलावलंय. काही आठवतंय का?’’ वेदिकाने म्हटले. त्यावर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले.
‘‘अरे हो की. तुम्हाला मी ओळखलंच नाही. मी तुम्हाला पहायला आलो, तेव्हा तुम्ही साडीत होता आणि आता ड्रेसमध्ये. कसं ओळखणार? पण हे आधी तुम्हाला सांगता येत नाही का?’’ प्रकाशने म्हटले.
‘‘अहो, तेच मी तुम्हाला सांगत होते.’’ वेदिकाने म्हटले. त्यानंतर प्रकाशने ‘सर्व्हर डाऊन’चा बोर्ड खिडकीवर लावला.
‘‘अहो, आता सिस्टीम चांगली होती ना. अचानक काय झालं?’’ एका ग्राहकाने त्रस्त होऊन विचारले.
‘‘हे मला काय विचारता? त्या कॉम्प्युटरला विचारा.?’’ प्रकाशने पण जशास तसे उत्तर दिले.
‘‘अहो, गेला तासभर मी रांगेत उभा आहे. दरवेळी माझ्याच बाबत असं का घडतं? याला जबाबदार कोण?’’ दुसऱ्या ग्राहकाने रागाने विचारले.
‘‘तुम्ही उद्या या.’’ प्रकाशने म्हटले.
‘‘अहो गेला आठवडाभर मी रोज खेटा मारतोय. रोज मला वेगवेगळ्या खिडकीवर नाहीतर टेबलवर पाठवलं जातंय. नुसता वैताग आलाय. या जन्मात तरी माझे काम होईल का?’’ एका ग्राहकाने त्रस्त होऊन विचारले.
‘‘अहो, तुमचं काम कधी होईल? कोणत्या जन्मात होईल, हे सांगायला मी काय ज्योतिषी आहे का?’’ प्रकाशने म्हटले.
त्यानंतर वेदिका आतमध्ये गेली.
‘‘तुम्हाला कामाचा बराच ताण दिसतोय.’’ तिने उत्सुकतेने विचारले.
‘‘लोकसेवेचे व्रत धारण केल्यावर कामाचा ताण येणारच ना. ग्राहक हा आमचा देव असतो. त्यांचा संतोष हेच आमचे समाधान असते. त्यांच्याशी आम्ही नेहमी संयम आणि नम्रतेने वागत असतो.’’ प्रकाशने आपल्या कामाची माहिती पुरवली.
‘‘तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? ‘सर्व्हर डाऊन’चा बोर्ड तुम्हाला वाचता येत नाही का? तुम्ही पुढच्या महिन्यांत या.’’ खिडकीसमोर उभ्या राहिलेल्या ग्राहकावर प्रकाश खेकसला.
‘‘तुम्ही बॅंकेत नेमकं काम काय करता?’’ वेदिकाने विचारले.
‘‘माझं काम अत्यंत जोखमीचं असतं. मात्र, ग्राहकांचे हित डोळ्यांसमोर ठेवूनच मी कामाला वाहून घेतो. अनेकदा कामाच्या धबडग्यामुळे मला जेवणच काय पण चहालाही वेळ मिळत नाही. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा मिळावे, हेच माझे ध्येय असते.’’ प्रकाशने म्हटले.
‘‘साहेब, काम बंद ठेवून आतमध्ये तुम्ही एका महिलेशी गुलूगुलू बोलताय.....’’ एका ग्राहकाने तक्रारीच्या सुरात म्हटले.
‘‘वाट्टेल ते बोलू नका. आमची महत्वाची मिटींग चालू आहे, हे तुम्हाला दिसत नाही का? या मिटिंगवर आमच्या आयुष्यभराचा निर्णय अवलंबून आहे. तुमचं काम यंदा होईल, असं मला वाटत नाही. तुम्ही निघा.’’ प्रकाश ग्राहकावर पुन्हा खेकसला. त्यानंतर वेदिका ‘मी निघते’ असे म्हणून बाहेर पडली. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्या उत्तराची ची वाट पाहत आहे. मात्र, तिच्या होकाराचा ‘सर्व्हर डाऊन’ झाल्यामुळे