आधारकार्ड अद्ययावतीकरणासाठी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधारकार्ड अद्ययावतीकरणासाठी मोहीम
आधारकार्ड अद्ययावतीकरणासाठी मोहीम

आधारकार्ड अद्ययावतीकरणासाठी मोहीम

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : दहा वर्षांपूर्वी काढलेल्या मात्र, माहिती अद्ययावत न केलेल्या आधारकार्डधारकांची संख्या जिल्ह्यात सुमारे ३० लाख असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढाकर घेऊन ‘आधार अद्ययावतीकरणाचा’ प्रायोगिक प्रकल्प शहरासह जिल्ह्यात हाती घेतला आहे. त्यासाठी सर्व शासकीय आधार केंद्रे सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारी योजना, लाभ यांसह रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, मोबाईलचे सीमकार्ड घेणे किंवा अद्ययावत करणे, बँक खाते उघडण्यापासून ते अगदी स्मशानभूमीपर्यंत सर्व ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधारची मागणी केली जाते. आधारवरील लिंग, नाव, पत्ता, छायाचित्र आदींमध्ये बदल झाल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असते. मात्र, दर दहावर्षांनी आधार अद्ययावत करावे लागते, याबाबत मात्र नागरिकांमध्ये जागरूकता नाही. नागरिक पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करून आधारवरील तपशीलात बदल करू शकतात. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूएआयडीएआय) ‘अपडेट डॉक्युमेंट’ नावाची नवी सुविधा तयार केली असून ‘माय आधार’ संकेतस्थळावर ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर माहिती अद्ययावत करता येते. मात्र, आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक स्वरूपाचे आहे. देशातील ४० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, यामध्ये पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

बोटांचे ठसे, पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे
ज्या नागरिकांनी दहा वर्षांपूर्वी आधार काढले आहे. अशा नागरिकांनी पत्ता, मोबाईल क्रमांक, तसेच बोटांचे ठसे बदलले असतील ते अद्ययावत करून घ्यायचे आहे. शहरातील आधार सेवा केंद्र, टपाल कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी आधार अद्ययावत करता येईल. माय आधार संकेतस्थळावरही ऑनलाइन पद्धतीने अद्ययावत करता येईल. आधारसाठी ओळखीच्या पुराव्यासाठी मनरेगा जॉब कार्ड, निवृत्तिवेतन कार्ड, पारपत्र, जन्मतारखेसाठी जन्म प्रमाणपत्र, पॅनकार्ड, गुणपत्रिका, ओळखीचा पुरावा म्हणून शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, वाहन परवाना ही कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत.

आधार अद्ययावतीकरणाची प्रक्रिया अद्याप बंधनकारक नसल्याने नागरिकांचा प्रतिसाद अल्प आहे. आधार अद्ययावत करण्यासाठी आधार केंद्रचालकांचे दोनदा प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मात्र, नागरिक आधार अद्ययावत करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. पारपत्र, मोबाईल क्रमांक, बँक खाते, मतदार ओळखपत्राला आधार जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. विविध कारणांसाठी वेगवेगळी कागदपत्रे जमा करावी लागतात. मात्र, आधार अद्ययावत असल्यास एकाच कागदपत्राने काम होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आधार अद्ययावत करून घ्यावे.
- रोहिणी आखाडे, आधार समन्वय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय