म्हाडाच्या घरांसाठी सोमवारी सोडत

म्हाडाच्या घरांसाठी सोमवारी सोडत

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १६ : म्हाडाने घरांसाठी काढलेल्या ऑनलाइन लॉटरीची सोडत सोमवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. दरम्यान विविध उत्पन्न गटातील नागरिकांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सहा हजार ५८ घरांसाठी ५८ हजार ४६७ अर्ज आले आहेत.
म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजनेतील ६३७ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील दोन हजार ९३८ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत दोन हजार ४८३ सदनिका अशा एकूण सहा हजार ५८ सदनिकांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीसाठी अर्ज करण्यास पाच जानेवारी २०२३ रोजी सुरुवात झाली. यंदा अर्ज करतानाच सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही कागदपत्रे मिळण्यास नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींनासुद्धा अडचणी येत होत्या. या सर्व पार्श्‍वभूमीवर म्हाडाने ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ दिली होती. त्यानुसार नागरिकांना २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार ५८ हजार ४६७ अर्जदारांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.
म्हाडाने सोडत जाहीर करतेवेळी सात मार्च २०२३ ही तारीख जाहीर केली होती. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागितली होती. मात्र, अधिवेशनामुळे वेळ मिळत नव्हती. अखेर म्हाडाच्या सोडतीसाठी वेळ उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. म्हाडाच्या पुणे येथील कार्यालयात सोडत येत्या सोमवारी काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सोडत काढण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com