संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही
संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही

संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : शहरातील सीसीटीव्हींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, संवेदनशील ठिकाणांसह इतर नवीन अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच वाहतुकीचे नियमन आणि गंभीर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने शहर पोलिसांकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी २०१३ मध्ये अलाइड डिजिटल सर्व्हिसेस या कंपनीला परवानगी दिली होती. त्यासाठी २२५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानंतर सध्याच्या परिस्थितीत बराच बदल झाला आहे. काही भागांत उड्डाणपूल, भुयारी मार्गांची बांधकामे झाली आहेत. तसेच, मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे काही भागांतील सीसीटीव्हींचा फारसा उपयोग होत नाही. तसेच, ग्रामीण हद्दीतील काही भाग शहर पोलिस आयुक्तालयात समाविष्ट झाला आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी शहरातील सर्व चौकांमधील सीसीटीव्ही तपासण्याचे निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने गुरुवारी (ता. १६) डेक्कन आणि शिवाजीनगर भागातील सीसीटीव्हींची पाहणी करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त मौला सय्यद, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील पवार यांच्यासह स्थानिक पोलिस अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने जर्मन बेकरी, लाल देऊळ, ओशो आश्रम, सरकारी कार्यालये यासह इतर संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून मिरवणुका, मोर्चा, आंदोलनातील प्रत्येक व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे दिसणार आहे.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतुकीचे नियमन आणि गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने सीसीटीव्हींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. काही आवश्यक ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याची वाहतूक नियमनासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील स्थिती दृष्टिक्षेपात
सध्याची निरीक्षणाची ठिकाणे ४५५
पुणे शहर ३६७
पिंपरी चिंचवड ८८
एकूण सीसीटीव्ही १३४१