इन्फ्लूएंझा नियंत्रणासाठी आरोग्य खाते ‘अलर्ट’

इन्फ्लूएंझा नियंत्रणासाठी आरोग्य खाते ‘अलर्ट’

पुणे, ता. १६ : राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये इन्फ्लूएंझा ‘ए’ या उपप्रकारातील वेगवेगळ्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या संशयित रुग्णांची संख्या दोन लाख ६६ हजार ९१२ आहे. त्यापैकी निश्चित निदान सर्वाधिक स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण आहेत. त्यामुळे इन्फ्लूएंझा नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याची यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
इन्फ्लूएंझा हा विषाणूंमुळे पसरणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ‘ए’मध्ये ‘एच१एन१’ (स्वाइन फ्ल्यू), ‘एच२एन२’ आणि ‘एच३एन२’ या उपप्रकारचे विषाणू आहेत. त्यांच्या संसर्गाचे प्रमाण सध्या राज्यात वाढले असल्याचे निरीक्षण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले.

इन्फ्लूएंझाबाबत रुग्णांचे सर्वेक्षण मुख्यतः रुग्णांना आढळणाऱ्या लक्षणांवर आधारित असल्याचे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. आरोग्य केंद्रात रुग्णांची केलेली तपासणी आणि त्यांना स्पष्ट दिसणारी लक्षणे या आधारावर उपचार करण्यात येतो.

राज्यात एक जानेवारी ते १५ मार्च या अडीच महिन्यांमध्ये इन्फ्लूएंझाच्या वेगवेगळ्या उपप्रकारच्या विषाणूंचा संसर्ग झालेले दोन लाख ६६ हजार ९१२ संशयित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. त्यापैकी ऑसेलटॅमीवीर दिलेल्या संशयित रुग्णांची संख्या एक हजार ५५८ आहे. यापैकी निश्चित निदान झालेल्या रुग्णांमध्ये स्वाइन फ्ल्यूच्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यातील ३२४ रुग्णांना स्वाइन फ्ल्यू झाला. तर, ‘एच३एन२’ होणाऱ्या रुग्णांची संख्या ११९ आहे. सध्या इन्फ्लूएंझाचा संसर्ग झाल्याने राज्यातील ७३ रुग्णांवर रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत, असे आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. स्वाइन फ्ल्यूच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ‘एच३एन२’चा संसर्ग झालेला एक संशयित रुग्ण मृत्युमुखी पडला असल्याचेही खात्याने सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
- कोरोना आणि इन्फ्लूएंझाबाबत रुग्ण सर्वेक्षण, सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- फ्लू सदृश्य रुग्णांचे त्यांच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण करण्यात येते
- त्या आधारावर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात येत आहेत.
- राज्यातील सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
- अत्यावश्यक औषधे व साधनसामुग्रीचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
- इन्फ्लूएंझा व्यवस्थापनाबद्दल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे.

लक्षणे
- ताप
- खोकला
- घशात खवखव
- धाप लागणे
- न्यूमोनिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com