उपनगरांमध्ये अवकाळी पावसामुळे तारांबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपनगरांमध्ये अवकाळी पावसामुळे तारांबळ
उपनगरांमध्ये अवकाळी पावसामुळे तारांबळ

उपनगरांमध्ये अवकाळी पावसामुळे तारांबळ

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : पुण्याच्या उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही भागात बराच वेळ विद्युत प्रवाह खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

उंड्री-पिसोळीत जोरदार हजेरी
उंड्री : उंड्री-पिसोळी आणि वडकी परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवेघाटातील रस्ता निसरडा झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. तसेच विद्युत प्रवाह खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

पावसामुळे अनेकांची तारांबळ
घोरपडी : घोरपडी व वानवडी परिसरात पावसामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. घोरपडी गावातील लालबहादूर शास्त्री मार्ग, रेसकोर्स परिसर, एम्प्रेस गार्डन, कवडे मळा परिसरात एका तासापेक्षा जास्त काळ विद्युत पुरवठा बंद होता. रस्त्यावर काळोख पसरला होता. पावसामुळे रस्त्यांवर वाहने घसरून किरकोळ अपघात झाले.

टेमघर येथे ५९ मिलिमीटर पाऊस
खडकवासला : टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वरसगाव येथे ३४, पानशेत येथे १९ तर, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९ मिलिमीटर पाऊस झाला. मुळशी तालुक्यातील कुंभेरी येथे ३५, ताम्हिणी दावडी येथे १०, दासवे लावासा येथे २१, ताथवडे येथे १३, पवना येथे ३५, भीमाशंकर येथे १२, कात्रज बोगदा येथे ११, भोर तालुक्यातील साखर येथे १२ व शिरवली येथे ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.