
पदवीसाठी आता ६०-४०चे सूत्र
पुणे, ता. १७ ः तुम्हाला जर आता पदवीचे शिक्षण घ्यायचे असेल, तर ६० टक्के श्रेयांक (क्रेडिट) हे मुख्य विषयासाठी आणि ४० टक्के श्रेयांक हे कौशल्याधारीत विषयांसाठी असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार सुकाणू समितीने शिफारशी राज्य सरकारकडे सुपूर्द केल्या आहेत.
राज्यात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून अव्यावसायिक अभ्यासक्रमांची पदवी ही चार वर्षांची होणार आहे. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर अनेक बदल अपेक्षीत असून, सुकाणू समितीने राज्य सरकारला आवश्यक त्या शिफारशी केल्या आहेत. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर ‘सकाळ’शी बोलताना सांगतात, ‘‘महाविद्यालयांना आता चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम प्रदान करायचा आहे. कौशल्य आणि मूल्याधारित अभ्यासक्रमांबरोबरच प्रत्यक्ष कार्यानुभवाचाही नव्या धोरणात समावेश आहे. विद्यार्थ्यांना आता ४० टक्के श्रेयांक हे व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचेही निवडता येतील.’’ पदवीसाठी श्रेयांक पद्धत एकसमान असावी म्हणून सुकाणू समितीने तीन आणि चार वर्षाच्या पदवीसाठी शिफारशी केल्या आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील पदवी अभ्यासक्रमांसाठी या वर्षीपासून हे बदल लागू होतील.
१) असे असतील श्रेयांक (क्रेडीट्स) ः (स्तंभालेख करावा)
तपशील ः तीन वर्षांची पदवी ः चार वर्षांची पदवी
किमान ः १२० ः १६०
कमाल ः १३२ ः १७६
२) एका वर्षासाठीचे श्रेयांक
किमान ः ४०
कमाल ः ४४
श्रेयांकाबाबत महत्त्वाचे
- एका सत्रासाठी किमान श्रेयांक ः २०
- एक वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ः ४० ते ४४ श्रेयांक आवश्यक. त्यातील सहा श्रेयांक कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे असावेत
- पदविका (युजी डिप्लोमा) ः ८० ते ८८ श्रेयांक, त्यातील सहा कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे असावेत
महाविद्यालयांसाठी महत्त्वाचे
- चौथ्या वर्षाला कौशल्याधारित किंवा संशोधनाधारित अभ्यासक्रमांत वर्गीकरण आवश्यक
- प्रशाला पद्धतीचा (स्कूल सिस्टम) अवलंब करावा लागेल
- आंतरविद्याशाखीय शिक्षणासाठी सुकाणू समितीच्या सूचनांनुसार बदल आवश्यक
- उद्योगांसह संशोधनासाठीही परस्पर सहकार्य आवश्यक
- एनईपीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि शिक्षकांचीही जागृती आवश्यक
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे
- ६० टक्के मुख्य अभ्यासक्रम त्याच शैक्षणिक संस्थेत पूर्ण करणे आवश्यक
- ४० टक्के कौशल्याधारित अभ्यासक्रमांसाठी इतर शैक्षणिक संस्थात प्रवेश घेता येईल
- संशोधन आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमाचे स्वतंत्र दोन पर्याय उपलब्ध