
सिंधू सेवा दलातर्फे गुरुवारी ‘चेटीचंड’
पुणे, ता. १७ : सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७३ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (ता. २३) सायंकाळी ७ वाजता क्वीन्स गार्डन रस्त्यावरील अल्पबचत भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी व दीपक वाधवानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार राजेंद्र फेरवानी, सहखजिनदार नीलेश फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला आदी उपस्थित होते. वासवानी म्हणाले, ‘‘या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच, गायक नील तलरेजा आणि निशा चेलानी यांचे व जनरेशन नेक्स्ट डान्स अकादमीचे सादरीकरण होणार आहे. सुमारे चार हजार सिंधी बांधव यात सहभागी होतील. सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व समाजाच्या परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याचा आमचा मानस आहे.’’