अँटीव्हायरल औषधाचा खडखडाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अँटीव्हायरल औषधाचा खडखडाट!
अँटीव्हायरल औषधाचा खडखडाट!

अँटीव्हायरल औषधाचा खडखडाट!

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : लहान मुलांच्या इन्फ्लूएंझा ‘ए’ विषाणू संसर्गावर प्रभावी ठरलेल्या ऑसेलटॅमिवीर या पातळ औषधाचा शहरात खडखडाट झाला आहे. सुमारे पंधरा दिवसांमध्ये या औषधाची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडील औषध साठा संपला आहे. नव्याने या औषधाचा पुरवठा झालेला नाही. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये हे औषध शहरात उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शहरात इन्फ्लूएंझा विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. सुरवातीला विशेषतः पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुले सर्दी, ताप, खोकला याने आजारी पडली. त्यानंतर आता मोठी माणसेही याच लक्षणांनी बेजार झाली आहेत. त्यामुळे अँटिव्हायरल असलेल्या ओसेलटॅमीवीरसारख्या औषधे शहरातील दुकानांमध्ये मिळत नाहीत. त्याचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती मिळाली.

या बाबत रुग्णाचे पालक संदेश सोनावणे म्हणाले, ‘‘मुलाला सलग दोन दिवस ताप होता. त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी सुरवातीला औषध दिले. मात्र, दोन दिवसांनंतरही ताप कमी झाला नाही. त्यामुळे औषध बदलून दिले. मात्र, हे औषध उपलब्ध झाले नाही. त्यावेळी या औषधाचा तुटवडा असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.’’

घाऊक औषध विक्रेते चेतन शहा यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, ‘‘शहरातील किरकोळ औषध विक्रेत्यांकडून अँटीव्हायरल औषधांची मागणी वाढली आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी दोन ते चार बाटल्या औषधांची विक्री होत होती, ती आता मागणी अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे या औषधाची आपल्या दुकानातून दररोज विक्री होणाऱ्या प्रमाणातच खरेदी करावी. त्याचा साठा करून ठेऊ नये.’’

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे खजिनदार रोहित करपे म्हणाले, ‘‘शहरातील औषध विक्रेते याची साठेबाजी करत नाहीत. इन्फ्लूएंझाची साठ वाढली आहे. त्यामुळे ओसेलटॅमिवीर औषधाची मागणी वाढल्याने याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्दी, खोकला झाल्याने घाबरलेले पालक मुलाला रुग्णालयात घेऊन जातात. तेथील डॉक्टर या औषधाची चिठ्ठी देतात. लहान मुलांसाठी याचे पातळ औषध उपलब्ध आहे. त्याचाच फक्त तुटवडा आहे. त्यातील गोळ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.’’
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त (औषध) श्याम प्रतापवार म्हणाले, ‘‘शहरात ओसेलटॅमीवीरच्या पातळ औषधांचा सध्या तुटवडा आहे. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये या औषधाचा साठा शहरात उपलब्ध होईल. सिप्ला आणि हेट्रो या दोन्ही औषध कंपन्यांचा साठ्याचा त्यात समावेश आहे.’’

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी या औषधाचा साठा करून ठेऊ नये. कारण, प्रत्येक विषाणूजन्य संसर्गाला हे औषध उपयुक्त ठरेलच असे नाही. तसेच, प्रत्येक ताप, खोकल्यासाठी प्रतिजैविकाची गरज नसते. वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतलेल्या साध्या औषधानेही आजार बरे होतात. त्यामुळे औषध मिळत नाही, म्हणून घाबरून जाऊ नये.
- श्याम प्रतापवार, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग

डॉक्टरांच्या चिठ्ठीच्या आधारावरच ओसेलटॅमीवीर औषधाची विक्री औषध विक्रेत्यांनी करता येईल. ते नसेल तर ते औषध ग्राहकांना देऊ नये. तसेच, औषधाच्या चिठ्ठीशिवाय या औषधाची मागणीही ग्राहकांनी विक्रेत्यांकडे करू नये. सध्या औषध उपलब्ध नसल्याने त्याचा साठा करून ठेऊ नका.
अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट