बालभारती-पौड फाटा रस्त्याला नागरिकांचा विरोध

बालभारती-पौड फाटा रस्त्याला नागरिकांचा विरोध

पुणे, ता. १८ ः महापालिकेने वेताळ टेकडीवरून आखलेल्या बालभारती-पौड फाटा रस्त्याला बहुसंख्य नागरिकांनी विरोध दर्शविला. पर्यावरण संवर्धनाला सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी ‘सकाळ’कडे मांडले. तर काही जणांनी रस्ता होण्याची गरज असल्याचे सांगत मुख्य रस्त्यावरील ताण कमी होऊन नागरिकांचाही वेळ वाचेल. वाढत्या शहरीकरणासाठी काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावीच लागेल, अशा शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.
मागील काही काळापासून केवळ चर्चेत अडकलेल्या बालभारती-पौड फाटा रस्त्याच्या कामासाठी निविदा काढण्याच्या प्रक्रियेला महापालिकेकडून गती देण्यात आली आहे. त्याला काही नागरिक व पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी ‘सकाळ’कडे प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
नागरिक जुई सराफ म्हणाल्या, ‘‘बालभारती- पौड फाटा रस्त्यामुळे नैसर्गिक हानी होईल, तसेच हा अवास्तव खर्च आहे. हाच पैसा पुणे अधिक हरित, स्वच्छ व सुंदर कसे होईल, यासाठी वापरावा. बस सुविधा चांगली करावी. मिनी बसचे मार्ग वाढवावेत, त्यामुळे रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल.’’
आरती होनप म्हणाल्या, ‘‘शहरातील मध्यवस्तीमधील टेकड्या हे पुण्याचे वेगळेपण असून, ते एक ओळख आहे. टेकड्यांवर सगळ्या वयोगटातील नागरिक फिरायला जातात. या टेकड्यांवर दुर्मीळ पक्षी, प्राणी व वनसंपदा आहे. वाहतुकीसाठी मेट्रो आहे, आणखीही काही वेगळे पर्याय आपल्याला शोधता येतील. सरसकट काँक्रीटीकरण नको. हा नैसर्गिक वारसा जपण्याची गरज आहे.’’

सेनापती बापट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. बालभारती-पौड फाटा रस्ता अतिशय गरजेचा आहे. हा रस्ता झाल्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, असे वाटते.
- एन. एस. पाटसकर

बालभारती-पौड फाटा रस्ता ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने रस्ता लवकर व्हायला पाहिजे. काही मोजक्‍या पर्यावरणवादी व स्थानिकांचा रस्त्याला होणारा विरोध नाहक आहे. अन्य लोकांना रस्त्याची नितांत गरज आहे.
- एस. के. जगताप

मी कोथरूडला राहतो. बाणेरला कामाला आहे. मला दररोज कार्यालयात जाण्यासाठी व येण्यासाठी चांदणी चौक किंवा सावित्रीबाई पुले पुणे विद्यापीठ रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता झाल्यास आमच्यासारख्या लाखो लोकांचा वेळ, ताण कमी होईल. तसेच अपघातांची संख्याही कमी होईल.
- केदार बने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com