
घाव बसंल घावावरी सोसायाला झुंझायाला अंगी बळ येऊ दे...
‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे...’ हे गाणं ऐकताच आम्ही जाग्यावर थांबलो. आवाजाच्या दिशेने पाहिले तर लोहारदादांच्या पालातून आवाज येत असल्याचे आम्हाला दिसले. आमची पावले नकळत तिकडे वळली. एक लोहारदादा भट्टीमध्ये बैलगाडीच्या चाकाची धाव तापवत असल्याचे आम्हाला दिसले. एक ताई भाता वर-खाली करत होती.
‘‘तुमच्या कामाची ‘भट्टी’ चांगलीच जमलेली दिसतेय.’’ आम्ही दोघांनाही दाद दिली.
‘‘नवरा-बायको एकाच बैलगाडीची दोन चाके आहेत, हे आमच्या व्यवसायाएवढं दुसरं कोणी नीट सांगू शकणार नाही. भात्याकडून चांगली रसद मिळाली तरच भट्टी चांगली फुलते. माझी बायको भात्याचं काम उत्तम करते. दोन्ही कामांमध्ये योग्य समन्वय असेल तरच कामाचा दर्जाही वाढतो.’’ दादांच्या उत्तराने आम्ही चमकलो. नवरा-बायकोचं नातं त्यांनी कमी शब्दांत विशद केलं होतं. थोड्यावेळाने दादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालू लागले.
आम्ही सहज विचारले, ‘‘दादा, किती वर्षे ऐरण आणि हातोडीला झालीत?’’
त्यावर दादा म्हणाले, ‘‘बऱ्याच वर्षापासून ऐरण एकच आहे. मात्र, हातोड्या अनेक तुटल्या.’’ आम्हाला आश्चर्य वाटले.
‘‘असे का होत असेल?’’ आम्ही विचारले.
त्यावर दादा म्हणाले, ‘‘साहेब, घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत. उलट ते कणखरपणे आणि चिवटपणे लढत राहतात. म्हणून तेच टिकून राहतात. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षात ऐरण तशीच आहे पण हातोड्या मात्र सतत तुटत राहिल्या.’’ दादांचे हे बोलणे ऐकून आम्ही स्तंभित झालो. जीवनाचे फार मोठे सार त्यांनी सांगितले होते.
‘‘पण ऐरणीच्या खाली लाकडाचा तुकडा का लावला आहे?’’ आम्ही सहज विचारले.
‘‘ऐरणीवर घणाचे किंवा हातोडीचे जोरदार घाव होत असतात. मात्र, ऐरणीला हे घाव सोसण्यास आधार मिळावा, तसेच ती खचू नये, तुटू नये यासाठी लाकडाचा तुकडा मदत करत असतो. ज्यावेळी आपलेच लोक आपल्यावर घाव घालत असतात. त्याचवेळी ना नात्याचे, ना गोत्याचे काहीजण आपल्या मदतीला धावून येत असतात. आपल्याला उभारी देत असतात. तेच काम येथे हा लाकडाचा तुकडा करतोय.’’ लोहारदादाने जीवनातील शाश्वत सत्य आमच्यासमोर मांडले होते.
‘‘तुमचा भाता चामडे आणि सागांच्या फळ्यांनी बनवलेला दिसतोय. असे का?’’ आम्ही विचारले.
‘‘आपल्या छातीचा भाता आणि आमच्याकडील भाता यात तसा फार फरक नाही. श्वास घेण्यासाठी आपल्या छातीचा भाता वर-खाली केला जातो. अगदी तसाच उपयोग आमच्याकडील भात्याचा होतो. अग्निदेवता ज्वलंत राहण्यासाठी चामडं व सागाच्या मजबूत फळ्यांनी आमचा भाता बनवला जातो. भात्याची साखळी वर-खाली करून, भात्याची फुंकर मिळताच, कोळसे लालभडक होतात आणि आगीच्या ज्वाळा झळाळू लागतात आणि जीवनाप्रमाणेच आमच्या कामाची साखळीही पूर्ण होते.’’ दादांनी उत्तर दिले.
तोपर्यंत दादांनी शेतीकामातील अनेक अवजारे भट्टीतून काढली होती व ऐरणीवर ठोकून त्यांना आकार दिला जात होता. आम्ही त्यांच्याकडे बघत राहिलो.
‘‘बरं का साहेब, आगीतून तावून-सुलाखून निघाल्याशिवाय कोणत्याही अवजाराला झळाळी प्राप्त होत नाही. माणसाचंही तसंच आहे. कोणत्याही क्षेत्रातील यश मिळवायचं असेल तर आगीतून तावून-सुलाखून निघाल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या.’’ लोहारदादांचं म्हणणं आम्हाला पटलं.
आतापर्यंत आम्ही ‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही’ एवढंच ऐकलं होतं. मात्र, माणसाला अनेकदा घणाचे घावदेखील सोसावे लागतात. जो असे घाव सोसून, कणखरपणे पुन्हा उभे राहतो, तोच आयुष्याची लढाई यशस्वीपणे जिंकू शकतो. हा धडा आम्हाला लोहारदादांनी नकळतपणे शिकवला होता.