
विद्यापीठांत पुन्हा निवडणुका सुरू करा : शुक्ल
पुणे, ता. १७ : राज्यातील विद्यापीठांत खुल्या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी केली.
एनटीए परीक्षेबद्दल शुक्ल म्हणाले, ‘‘नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि इतर परीक्षांना जीएसटी करमुक्त करण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय स्वागतार्ह आहे. यापूर्वी ८ टक्के जीएसटी कर लावल्याने शुल्कात आणखी वाढ झाली असती. विविध परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना परवडेल, असे असावे.’’
देशभरात पेपर फुटीचे प्रकार वाढत असून, त्याला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने समिती नियुक्त करून या प्रकरणात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल आदी उपस्थित होते.