
चौथ्या दिवशीही कार्यालयांचे दैनंदिन कामकाज ठप्प
पुणे, ता. १७ : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या चौथ्या दिवशीही कार्यालयांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले होते. त्यातच उद्या (शनिवार) आणि रविवार दोन दिवस सुटी आल्याने शासकीय कार्यालयांचे कामकाज सलग सहा दिवस बंद राहून नागरिकांची गैरसोय होणार आहे. दरम्यान, विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी शुक्रवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचारी संघटनांकडून या वेळी सांगण्यात आले.
जुन्या निवृत्तिवेतन योजनेच्या मागणीसाठी मंगळवारपासून (१४ मार्च) शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, सहकार, कृषी आणि साखर आयुक्तालय, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, जलसंपदा विभाग, ससून रुग्णालय, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), भूमी अभिलेख, विवाह नोंदणी कार्यालय अशा विविध विभागांमधील दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. या संपाचा परिणाम आता नागरिकांवर जाणवू लागला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. त्यात पुणे महापालिकेच्या शाळांमधील अडीच हजारपैकी एक हजार शिक्षक सहभागी झाले होते. त्यामुळे अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नव्हते. संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी जाहीर केले.