एकल व्यक्तींची ‘आनंदयात्रा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकल व्यक्तींची ‘आनंदयात्रा’
एकल व्यक्तींची ‘आनंदयात्रा’

एकल व्यक्तींची ‘आनंदयात्रा’

sakal_logo
By

प्रौढ एकल व्यक्तींना भावनिक आधार देऊन त्यांचे एकटेपण सह्य करणाऱ्या आनंदयात्रा एकल स्वमदत गटाचा १५वा वर्धापनदिन १९ मार्च रोजी प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते पुणे येथे संपन्न होत आहे. त्या निमित्ताने...

- विश्वास गोसावी

आनंदयात्रा ही संस्था स्थापन केली पुण्यातील नेस वाडिया कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. हेमंत देवस्थळी यांनी. आपल्या पत्नीच्या अपघाती निधनामुळे बसलेल्या धक्क्यातून ते सावरत होते. तेव्हा आपल्याप्रमाणेच एकाकी आयुष्य नशिबी आलेल्या एकल (विधवा, विधुर, विभक्त व अविवाहित ) लोकांना एकत्र करून त्यांचा एखादा आधार गट का स्थापन करू नये असे त्यांच्या मनात आलं आणि आपल्या काही स्नेही मंडळींच्या मदतीने त्यांनी हा गट १६ मार्च २००८ मध्ये स्थापन केला. तेव्हापासून दर आठवड्याला एक असे निष्ठेने या गटाचे कार्यकर्ते काहीना काही उपक्रम आयोजित करीत आहेत व एकाकीपणामुळे आलेल्या नैराश्यातून एकाकींना बाहेर काढीत आहेत. एकाकीपणाच्या प्रश्नाने आता जगभर उग्र स्वरूप धारण केले आहे. इंग्लंडमध्ये तर एकाकीपणातून निर्माण होणारे प्रश्न हाताळण्यासाठी खास एका मंत्र्याची नेमणूक झाली आहे.
आनंदयात्रेनं या प्रश्नाचं गांभीर्य १५ वर्षांपूर्वी ओळखलं. आतापर्यंत या गटाने हजार एक एकल व्यक्तींच्या आयुष्याला स्पर्श करून त्यांचं एकाकीपण सह्य करण्यात मदत केली आहे. सहली, संमेलनं, व्याख्यानं, संगीत, चर्चा, सामाजिक मदत अशा व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आनंदयात्रा वर्षभर समृद्ध होत राहाते. परिणामी आपल्या एकटेपणातही एकल व्यक्तींना जगण्यासाठी एक नवीन उमेद मिळते.
आनंदयात्रेच्या या प्रयत्नात निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी दर आठवड्याला होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेऊन भरभरून मदत केली आहे. आनंदयात्रा हे पुनर्विवाह मंडळ नाही; पण एकाकी जीवनात थोडा आनंद निर्माण करणारं मैत्र मात्र इथं खचित सापडू शकतं. विद्या बाळ, अनिल अवचट, अनु आगा, दाजीकाका गाडगीळ, मंगेश तेंडुलकर, श्रीकांत मोघे, जयंत नारळीकर, ह. वि. सरदेसाई, संजय उपाध्ये, मोहन आगाशे, अच्युत गोडबोले, दिलीप प्रभावळकर, रामदास फुटाणे, गिरीश ओक, सदानंद मोरे, बाबासाहेब पुरंदरे अशा अनेक दिग्गजांनी आनंदयात्रीमधील या मैत्राला आपली साथ देऊन आनंदयात्रीचे जीवन अधिक समृद्ध केले आहे. या सर्वांचा परिणाम आनंदयात्रा एकल व्यक्तिचे एक मुक्त व्यासपीठ होण्यात झाला आहे. भविष्यामध्ये सर्व प्रकारच्या एकल व्यक्तींचे प्रश्न या व्यासपीठावर चर्चिले जावेत व समाजातील वाढत्या एकाकीपणाची समाजाने दखल घ्यावी हे आनंदयात्रेचे उद्दिष्ट राहणार आहे..
आनंदयात्रेची संकल्पना देशाच्या इतर भागांमध्ये योग्य प्रकारे वापरल्यास अशी व्यासपीठे सर्व देशभर निर्माण होऊ शकतील व आज एकल व्यक्तींची समाजात जी भावनिक घुसमट झालेली आहे ती कमी होण्यास खूप मदत होईल. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे स्त्रीपुरुषांनी एकत्र येण्यात काहीही गैर नाही असे समाज मानस तयार होण्यासाठीही याची मदत होईल.

(सभासदत्वासाठी संपर्क : हेमंत देवस्थळी ९५५२१२७१२७)