
भगिनी निवेदिता बँकेचा सुवर्ण महोसव
पुणे ः भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा सुवर्ण महोसव शुभारंभ सोहळा बुधवारी (ता. २२) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. त्यानिमित्ताने आयोजित सोहळ्याचे माजी केंद्रीय मंत्री आणि ऋषिहुड विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सुरेश प्रभू हे अध्यक्ष असतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आणि लेखिका मृदुला भाटकर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. या कार्यक्रमात बँकेच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘सुवर्ण भरारी’ या स्मरणिकेचे प्रकाशन प्रभू, भाटकर यांच्या हस्ते होईल. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स या संस्थेचे कुलगुरू, लेखक आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, डॉ. अजित रानडे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. हा कार्यक्रम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) मुख्य सभागृहात होईल, अशी माहिती अध्यक्षा सीए डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा दीपा दाढे, मुख्य कार्यकारी अध्यक्षा स्मिता देशपांडे यांनी दिली.