
‘राख’ लघुपटाचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात प्रदर्शन
पुणे, ता. १८ : राहुल पणशीकर दिग्दर्शित व राहुलस् ग्राफिक्स या संस्थेतर्फे निर्मित अवयवदनावर भाष्य करणाऱ्या ‘राख’ या लघुपटाचे प्रदर्शन नुकतेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय ( एनएफआय) येथे झाले. मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला हा लघुपट एका उतारवयातील यशस्वी उद्योजकाची अवयवदानवरील जनजागृतीची तळमळ मांडतो.
याप्रसंगी फ्लिटगार्ड फिल्ट्रमचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, विपणन प्रमुख पीयूष श्रीवास्तव आदी उपस्थित होते. देशात किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची गरज ही २ लाख रुग्णांना असताना केवळ ६ हजार रुग्णांना ते उपलब्ध होऊ शकते. याशिवाय दरवर्षी हृदय प्रत्यारोपणाची गरज भासणाऱ्या ५० हजार जणांचा मृत्यू होत असून केवळ १० ते १५ रुग्णांनाच हृदय उपलब्ध होते, अशी माहिती पणशीकर यांनी दिली. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लघुपट पोहोचावा या उद्देशाने स्पर्धांसोबत अनेक ठिकाणी आम्ही त्यांचे प्रदर्शन करणार आहोत, असेही या वेळी सांगण्यात आले. सामाजिक भान जागृत करत या लघुपटात देण्यात आलेला अवयवदानाचा संदेश हा नागरिकांच्या मनाला भिडेल, असा विश्वास या वेळी श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.